Join us

‘मुंगळा’ चित्रपटात मांडली दुष्काळाची व्यथा

By admin | Updated: October 1, 2015 01:29 IST

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे असलेला दुष्काळ चित्रपटाचा विषय ठरू लागला आहे. यापूर्वीही अनेक हिंदी, मराठी चित्रपटात दुष्काळाचा विषय गांभीर्याने मांडला गेलेला आहे

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे असलेला दुष्काळ चित्रपटाचा विषय ठरू लागला आहे. यापूर्वीही अनेक हिंदी, मराठी चित्रपटात दुष्काळाचा विषय गांभीर्याने मांडला गेलेला आहे. मात्र दुष्काळावर मात करत जीवन जगण्याचा संदेश देणारा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अगदी सर्वांच्याच परिचयाचा असलेल्या मुंगळ्याचा गुणधर्म या मराठी चित्रपटाच्या कथेत उतरवण्यात आला आहे. यामुळे चित्रपटाला नाव देखील ‘मुंगळा’ असेच देण्यात आले आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटेल अशा एका गावातील काही कुटुंबातल्या वेगळ्या कथेच्या स्वरूपातून दुष्काळाचे भीषण चित्र त्यामध्ये मांडले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण दुष्काळी माण तालुक्यातील एका गावात झाल्याने दिग्दर्शक, निर्माता व कलाकार यांनाही प्रत्यक्ष दुष्काळ अनुभवायला मिळाला.प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार, नैसर्गिक आपत्तीमुळे येणारे संकट अशा अनेक कारणांमुळे प्रत्येक जण एका दुष्टचक्रात कसा अडकतो हीच वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न ‘मुंगळा’ च्या माध्यमातून दिग्दर्शक विजय देवकर व सहकाऱ्यांनी केला आहे. मंगळवारी सानपाडा येथील लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी ‘मुंगळा’ विषयी माहिती दिली. यावेळी अभिनेते वैजनाथ चौगुले, अभिनेत्री ज्योती जोशी यांच्यासह निर्माते गौरव भानुशाली उपस्थित होते. हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला सामाजिक प्रश्नांवर विचार करायला लावणारा असून, त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यासाठी शासन, प्रशासनाला नक्कीच प्रवृत्त करणारा ठरेल, असे देवकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आल्याचे निर्माते गौरव भानुशाली यांनी स्पष्ट केले. नुसतीच आश्वासने देण्यापेक्षा त्यावर उपाय सुचवणे शक्य आहे हे दाखविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आल्याची माहिती अभिनेत्री ज्योती जोशी हिने दिली. तर आजवर आपण विनोदी भूमिका केलेल्या असून ‘मुंगळा’ या चित्रपटातून प्रथमच वेगळी भूमिका साकारत आहे.चित्रपटात लोकेश गुप्ते, गणेश यादव, दीपक करंजीकर, जनार्दन परब, भूषण घाडी, राम कदम, अमोल कुलकर्णी आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कथा-पटकथा-संवाद विजय देवकर यांचे असून सहाय्यक दिग्दर्शकाचे काम प्रवीण खामकर यांनी पाहिले. तांत्रिक बाजू विजय गावंडे, फैसल इम्रान, ब्रियांका बिरोल, अमोद दोषी, बाबूभाई हुलमानी आदींनी सांभाळल्या आहेत.