Join us  

स्मिता तांबेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'मन धागा धागा जोडते नवा'मध्ये एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:08 PM

'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हिची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता त्यांचे नाते अतिशय नाजूक वळणावर आहे. दरम्यान आता या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हिची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच आनंदी आणि सार्थक लग्नाच्या बेडीत अडकले. सगळे काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच आनंदीचा पहिला नवरा अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख आणि चालाख असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हण्टल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवीन नाट्य घडणार आहे. या केसमधून सार्थक निर्दोष सुटणार का? सार्थक-आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हानं येणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.  

टॅग्स :स्मिता तांबे