मराठीमध्ये सध्या अनेक प्रयोग होत आहेत. ‘बायोस्कोप’ चित्रपटासाठी चार दिग्दर्शक एकत्र आले, तर ‘शॉर्टकट - दिसतो पण नसतो’ या चित्रपटासाठी चक्क सहा संगीकार एकत्र आले आहेत. ‘सायबर क्राइम’सारख्या अत्यंत ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या आगामी मराठी सिनेमासाठी वैविध्यपूर्ण असे प्रयोग करण्यात आले असून, प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा सध्या सर्वत्र चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सहा गाणी असून, त्यातील चार गाणी मराठीत, तर दोन गाणी हिंदीत आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा संगीतकारांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली असून, एक वेगळाच प्रयोग दिग्दर्शक हरीश राऊत यांनी या सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. संगीतकार नीलेश मोहरीर, सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनित दीक्षित, चाँद साध्वानी आणि निक या सहा संगीतकारांनी प्रत्येकी एका गाण्याला संगीत दिले आहे, तर सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर, कौशिक देशपांडे, महंमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, गायिका सावनी रवींद्र, आनंदी जोशी आणि राही यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. अभिनेता वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, राजेश शृंगारपुरे आणि नरेश बिडकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार असून, येत्या ७ आॅगस्टपासून हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी प्रमोटर म्हणून काम पाहणाऱ्या ‘जीएसईएएमएस’ कंपनीचे अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशाणदार हे या सिनेमासाठी प्रमोटर म्हणून काम पाहत आहेत.
एकाच चित्रपटासाठी सहा संगीतकार
By admin | Updated: July 29, 2015 03:53 IST