Join us  

हे शटर उघडायला हवं !

By admin | Published: July 04, 2015 1:00 AM

इतर भाषांतल्या चित्रपटांचा मराठीत रीमेक करताना मराठी संस्कृती, परंपरा तसेच भाषेचा लहेजा सांभाळणे महत्त्वाचे ठरते. असे प्रयोग कधी सफल होतात, तर कधी असफल; परंतु ‘शटर’

- राज चिंचणकर

इतर भाषांतल्या चित्रपटांचा मराठीत रीमेक करताना मराठी संस्कृती, परंपरा तसेच भाषेचा लहेजा सांभाळणे महत्त्वाचे ठरते. असे प्रयोग कधी सफल होतात, तर कधी असफल; परंतु ‘शटर’ या चित्रपटाने मात्र हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सशक्त कथा, तिला मिळालेली पटकथेची अचूक साथ, उत्तम दिग्दर्शन आणि कलावंतांनी केलेली दमदार सोबत याचे जमून आलेले मिश्रण या चित्रपटात एकजीव झाले आहे. एका वेगळ्या जॉनरचा हा चित्रपट आहे आणि हा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी हे शटर उघडणे भाग आहे.एक रात्र आणि एक दिवस या कालावधीत या चित्रपटाची गोष्ट घडते आणि त्यातून हे शटर काही तरी वेगळा फील देण्याचा प्रयत्न करते. एक गृहस्थ, एक रिक्षावाला, एक शरीरविक्रय करणारी स्त्री आणि एक चित्रपट दिग्दर्शक या चार व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ही गोष्ट उलगडत जाते. बायको आणि दोन मुली यांच्यासह जितेंद्र ऊर्फ जित्याभाऊचा सुखाचा संसार सुरू आहे. त्याचे मित्रांचे एक टोळके आहे आणि त्याच्या घराच्या शेजारीच असलेल्या त्याच्या पडीक दुकानात हे सर्व जण एका रात्री एन्जॉय करण्यासाठी पार्टीचा बेत आखतात. या मित्रपरिवारात असलेला एक्या हा रिक्षावाला त्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊन येतो. पार्टी संपते आणि एक्या सोडून सगळे मित्र पांगतात. पण जित्याभाऊचे समाधान झालेले नसल्याने तो एक्याला घेऊन बाहेर पडतो. सुनसान रस्त्यावर एका शरीरविक्रेत्या स्त्रीची त्याची नजरानजर होते आणि त्याक्षणी जित्याभाऊच्या मनात मोह उत्पन्न होतो. एक्याला हाती धरून तो तिला त्या दुकानात घेऊन येतो. त्या दोघांना आत ठेवून सावधानता म्हणून एक्या त्या दुकानाच्या शटरला बाहेरून कुलूप लावून निघून जातो. इथून सुरू होतो त्या रात्रीचा खेळ आणि जित्याभाऊ, ती स्त्री, एक्या व त्याला बाहेर भेटणारा चित्रपट दिग्दर्शक या चौघांच्या बाबतीत अनेक उलथापालथी घडवत ती रात्र सरत जाते.या गोष्टीत फोकस आहे तो चार व्यक्तिरेखांवर आणि पटकथा लिहिताना या चौघांना एकत्र गुंफण्याची भन्नाट कामगिरी मनीषा कोरडे हिने केली आहे. प्रसंगांची एकात एक गुंफलेली ही साखळी मजबूत आहे आणि पुढे काय होईल याबाबत ती सतत उत्कंठा वाढवत राहते. या प्रसंगांना असलेल्या लॉजिकचे भान सांभाळण्यात आणि ते पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक व्ही.के. प्रकाश यांनी बाजी मारली आहे. यातला प्रत्येक प्रसंग ठाशीव झाला आहे. कलाकारांकडून त्यांनी भूमिका चोख वठवून घेतल्या आहेत. उत्तम कॅमेरावर्कमुळे चित्रपटाच्या दिसण्यात ताजेपणा आहे आणि तो सुखावह आहे.अलीकडे एका विशिष्ट चाकोरीत अडकलेला सचिन खेडेकर या चित्रपटात मात्र अतिशय वेगळ्या प्रकारे समोर आला आहे. त्याच्यातल्या अभिनयाची ताकद दाखवून देणारी त्याची भूमिका यात पाहायला मिळते. मनात नसूनही मोहाच्या क्षणी तोल ढळलेला, नंतर त्याचा पश्चात्ताप झालेला, आलेल्या प्रसंगातून वाट शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करणारा जित्याभाऊ यात सचिनने दमदार वठवला आहे. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीची भूमिका रंगवताना सोनाली कुलकर्णीने कुठेही पातळी न सोडता केलेली किमया भन्नाट आहे.या व्यक्तिरेखेच्या मागे लपलेला भडकपणा आणि बटबटीतपणा टाळून तिने पेश केलेली ही स्त्री ग्रेसफुल वाटते. अमेय वाघ याने रिक्षावाला एक्याच्या भूमिकेत बराच भाव खाल्ला आहे. प्रकाश बरे या अमराठी कलावंताने यातल्या चित्रपट दिग्दर्शकाची रंगवलेली भूमिका लक्षवेधी आहे. इरावती हर्षे, जयवंत वाडकर यांच्यासह इतर कलावंतांनीही आपापली जबाबदारी चोख पार पाडली आहे. मराठी चित्रपटातून एक आगळावेगळा आणि जिवंत अनुभव घेण्याची इच्छा असेल, तर या शटरच्या पलीकडे डोकावून पाहणे मस्ट आहे.