मुंबई : बैठी कामे करणे, जंक फूड, व्यायाम नाही, अभ्यासाचा आणि मग कामाचा ताण यामुळे लहान वयातच अनेकांना मधुमेहाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारात मधुमेहाचा क्रमांक पहिला लागतो. जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो. हाच संदेश देणारी अॅनिमेटेड शॉर्टफिल्म पुढचा महिनाभर १०० हून अधिक मल्टिप्लेक्स आणि एक पडदा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन समस्या ठळकपणे लोकांसमोर आणून जनजागृती करण्यासाठी महापालिका आणि एका खासगी कंपनीने मिळून ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. २४ जुलैपासून ही शॉर्टफिल्म चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या ‘स्वास्थ्य में है स्वाद’ या मोहिमेचा एक भाग म्हणून जनजागृतीसाठी ही शॉर्टफिल्म दाखवण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून ही फिल्म बनवण्यात आली आहे. आता ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. मधुमेह चार हात लांब ठेवण्याकरता आरोग्यदायी खाणे आणि व्यायाम करणे या २ गोष्टींवर ही फिल्म भाष्य करते. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अशा अभिनव उपक्रमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे साहाय्यक आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. काय आहे शॉर्टफिल्ममध्ये ?-दोन लहान मुलांच्या वेगवेगळ्या जीवनशैली चित्रित करण्यात आल्या आहेत. यातील एक मूल योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, मैदानी खेळ खेळणे अशी आरोग्यदायी जीवनशैली अनुसरते आहे. -तर दुसरे मूल जंक फूड खाणे, आळशाप्रमाणे बसून राहणे, टीव्ही पाहणे नाही तर झोपणे अशी आरोग्यास अपायकारक असलेली जीवनशैली अवलंबते आहे. या २ वेगळ्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. -या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून पालक आणि मुलांमध्ये आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व बिंबवण्याचा आणि त्यातून लठ्ठपणा, मधुमेह अशा समस्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आहे.
महिनाभर चित्रपटगृहात झळकणार मधुमेहाची शॉर्टफिल्म
By admin | Updated: July 26, 2015 03:33 IST