Join us

ट्विटरवर मुलांचा धर्म विचारणा-याला शिरीष कुंदरचं सडेतोड उत्तर

By admin | Updated: January 5, 2017 10:17 IST

तुझी मुलं हिंदू आहेत की मुस्लिम ? असा प्रश्न विचारत एका महिलेने दिग्दर्शक शिरीष कुंदरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - ट्विटरवर सेलिब्रेटिंनी एखादा फोटो टाकल्यास त्यावरुन त्यांना टार्गेट करणारे अनेकजण असतात. अनेकदा या ट्रोलिंगचा सेलिब्रेटिंना सामना करावा लागतो. अशावेळी अनेकजण शांत बसतात तर काहीजण योग्य उत्तर देतात. अशाच प्रकारे ट्रोल करण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीला दिग्दर्शक शिरीष कुंदरने योग्य उत्तर देत एकदम बोलती बंदच केली. त्याचं हे ट्विट लोकांना भलतंच आवडलं असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. 
 
शिरीष कुंदर आपली पत्नी फरहा खान आणि मुलांसोबत फिरायला गेला होता. यावेळी त्याने आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर एका महिलेने शिरीष कुंदरला तुझी मुलं हिंदू आहेत की मुस्लिम ? असा प्रश्न विचारत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. शिरीष कुंदरने यावरुन कोणताही संताप व्यक्त न करता शांतपणे 'पुढे कोणता सण येणार आहे यावर ते अवलंबून आहे, गेल्या महिन्यात ते ख्रिश्चन होते', असं योग्य आणि सडेतोड उत्तर दिलं. 
 
शिरीष कुंदरने दिलेल्या या उत्तराचं ट्विटरकर भरभरुन कौतुक करत आहेत. या ट्विटला 2700 जणांनी रिट्विट केलं असून 5000 लोकांनी लाईक केलं आहे.