Join us  

दु:खद!! अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:08 AM

मुंबईच्या नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला.

ठळक मुद्देत्यांच्या निधनावर कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी याचे वडिल आणि गुजराती रंगभूमी कलाकार व नाट्य दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी शिवाय बराच मोठा आप्त परिवार आहे. मानसी ही सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील मोठे नाव आहे. ती अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे.

अरविंद जोशी यांनी अनेक हिट गुजराती सिनेमांत दमदार भूमिका साकारल्या होत्या. मात्र गुजराती रंगभूमी कलाकार आणि गुजराती नाट्यदिग्दर्शक म्हणूनच त्यांना ओळखले गेले. हिंदी सिनेमांबद्दल सांगायचे तर इत्तेफाक, शोले, अपमान की आग, खरीदार, ठीकाना, नाम या अनेक सिनेमांत त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. अनेक हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. शोले या आयकॉनिक सिनेमात अरविंद यांनी संजीव कुमार उर्फ ठाकुरच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारली होती. त्याची व ठाकूरच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांची  गब्बरने हत्या केली होती.  

त्यांच्या निधनावर कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेते परेश रावल यांनी अरविंद जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केले. अरविंद जोशी यांचे निधन ही भारतीय रंगभूमीची मोठी हानी आहे. एक हरहुन्नरी अभिनेता, एक मोठा नाट्यदिग्दर्शक, एक निर्मळ माणूस आपण गमावला, अश शब्दांत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :शरमन जोशी