अस्सल ते शेवटी अस्सलच. नक्कल कचकड्याचीच ठरते, असे म्हणतात. हीच गोष्ट काही चित्रपटांबाबत खरी ठरते. एखादा चित्रपट हिट ठरल्यावर त्याचा ‘सीक्वेल’ काढला जातो. मूळ कथेत आणखी मसालाही टाकला जातो. परंतु, हिट चित्रपटाचा आत्मा सीक्वेलमध्ये येत नाही. त्यामुळे अपवाद वगळता सीक्वेल हे फ्लॉपच ठरले आहेत. हिंदी आणि मराठीतील काही सीक्वेलचा घेतलेला आढावा...टाइमपासकोवळ्या वयात फुलणाऱ्या चित्रपटातील प्रेमकहाणीने ‘मला वेड लागले प्रेमाचे’ म्हणायला तरुणाईला भाग पाडले. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. केतकी माटेगावकर (प्राजक्ता) आणि प्रथमेश परबच्या (दगडू) निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. याच चित्रपटाच्या सीक्वेलबाबत ‘टाइमपास-२’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. त्यामुळे रवी जाधव ‘टाइमपास २’मधून काय आणणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. प्राजक्ता आणि दगडूच्या मोठेपणीच्या रूपात प्रिया बापट व प्रियदर्शन जाधव यांना घेण्यात आले. मात्र त्यांची जोडी पडद्यावर प्रेक्षकांना विशेष रुचली नाही. ‘टाइमपास २’ फ्लॉपच ठरला.अगं बाई अरेच्चा!बायकांच्या मनात काय चाललंय हे समजणं तसं अवघड. पण या चित्रपटामध्ये चक्क बायकांच्या मनातलं जाणून घेता येत असल्यामुळे संजय नार्वेकरच्या भूमिकेने जाम धमाल उडवून दिली. यातील ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही गाणीदेखील गाजली. केदार शिंदेचा हा चित्रपट हिट ठरला. केदारचा पहिला चित्रपट हा पाच इंद्रियांपैकी ‘श्रवणेंद्रियावर’ आधारित होता, याच मालिकेत चित्रपट काढण्याचा मानस व्यक्त करीत त्याने ‘स्पर्श’ हा विषय घेऊन त्याचा सीक्वेल ‘अगं बाई अरेच्चा 2’ काढला. सोनाली कुलकर्णीने आपले वजनदेखील घटविले होते. पण पहिल्यासारखी मजा या चित्रपटात आली नाही. झपाटलेला‘ओम फट स्वाहा..’ म्हणत तात्या विंचूच्या बाहुल्याचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे याच्या विनोदाने प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट केली. ‘झपाटलेला 2’ हा पहिला मराठी चित्रपट होता जो थ्रीडीमध्ये आणण्यात आला. तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे वापर, मराठीतील स्टार कॉमेडियन मकरंद अनासपुरे याच्यासह ‘झपाटलेला’ सीक्वेल प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. मात्र, केवळ तंत्रज्ञान चित्रपटाला यशस्वी करू शकत नाही, त्यासाठी काही तरी कंटेंटदेखील लागते. इथेच त्याने काहीसा मार खाल्ला. मुंबईतील पोलीस दलाचे चित्रण, ‘एन्काउंटरकिंग’ची कहाणी आणि जोडीला नाना पाटेकर यांचा अभिनय यामुळे ‘अब तक छप्पन’ने इतिहास घडविला. मात्र, तेच नाना पाटेकर असूनही ‘अब तक छप्पन २’ची जादू मात्र बॉक्स आॅफिसवर चालली नाही. मुंबई-पुणे-मुंबई ‘मुंबई-पुणे-मुंबई’ साधीशी कथा; पण स्वप्निल जोशी-मुक्ता बर्वे यांचा अभिनय आणि हटके विषय यामुळे प्रेक्षकांच्या मनात उतरली. या दोघांनाच घेऊन त्याचा सीक्वेल येत आहे. प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखविण्यात येत आहे. पण या चित्रपटाचे जे प्रोमोज येत आहेत त्यावरून ‘हम आपके है कौन’ची नक्कल तर नाही ना? अशी शंका वाटू लागली आहे. मूळ ‘एमपीएम’मध्ये कलाकारांची भाऊगर्दी नव्हती; मात्र स्वप्निल-मुक्ताने आपल्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग फुलविला होता. सीक्वेलमध्ये अख्खं वऱ्हाडच असल्याने या दोघांना किती संधी मिळतेय, लव्हस्टोरीचे पॅशन त्यामध्ये येतेय का? याबाबत प्रेक्षकांच्या मनात शंकाच आहेत. ‘एमपीएम २’ केवळ लग्नाचा व्हिडीओ होऊ नये हीच अपेक्षा. हेराफेरी‘हेराफेरी’मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकूटाने धमाल उडविली. विनोदाला कारुण्याची झालर असल्याने हा चित्रपट सर्व स्तरांत यशस्वी झाला. हेच त्रिकूट आणि जोडीला सर्कसपासून अनेक गमतीजमती असूनही या चित्रपटाचा सीक्वेल ‘फिर हेराफेरी’मध्ये प्राणच फुंकला गेला नाही. त्यामुळे ‘फिर हेराफेरी’ फ्लॉपच ठरला.
सीक्वेल फ्लॉपच
By admin | Updated: October 28, 2015 00:02 IST