Join us  

सैराट फेम तानाजी झळकणार हिंदी शोमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 10:53 AM

भिनेता तानाजी गलगुंडे लवकरच हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27- सैराट सिनेमातील आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळणारा अभिनेता तानाजी गलगुंडे लवकरच हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैराट सिनेमात त्याने साकारलेल्या लंगड्याच्या भूमिकेने चांगलीच पसंती मिळवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या रूपात तो प्रेक्षकांच्या समोर यायला सज्ज झाला आहे. कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये तानाजी प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमात तानाजी आकर्षण असल्याची चर्चा सध्या स्मॉल स्क्रीनवर रंगली आहे.
 
या शोमध्ये अभिनेता तानाजी गलगुंडेसोबत ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम रिधीमा पंडितही दिसणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना आणि रोशेल राव यांच्या ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा आहेत तशाच पद्धतीने रिधीमालाही दाखवले जाईल असं बोललं जातं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ प्रमाणेच हा कॉमेडी शो असेल अशही चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा या शोमध्ये दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये ज्याप्रमाणे सिद्ध यांची भूमिका आहे तशीच मिथुन चक्रवर्ती यांची असणार आहे. 
सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमाच्या प्रमोशनसाठी टीमने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सोनी टीव्हीने तानाजीला या नवीन शोसाठी विचारलं होतं,अशी माहिती मिळते आहे. तानाजीला विनोदाची चांगलीच जाण आहे. त्यामुळेच त्याची या टिव्ही शोसाठी निवड करण्यात आली असं म्हटलं जात आहे.
 
कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, सुगंधा मिश्रा आणि अली असगर यांच्यासोबत रिधीमा आणि तानाजी पहिल्यांदाच काम करत आहेत. ‘बहु हमारी रजनीकांतामध्ये रिधीमाने रोबोटची विनोदी व्यक्तिरेखा साकारली होती त्यामुळे या कॉमेडी शोसाठी रिधीमाला चॅनेलने विचारणा केली आहे. द कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाइट्स बचाओ या कॉमेडी शोमधील कलाकार घेऊन ‘द ड्रामा कंपनी’ची टीम तयार करण्यात आली आहे. जुलै महिन्यात हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
रिधीमा आणि तानाजीशिवाय मनोज आणि सीमा पाहवा हे दोघेही या शोमध्ये दिसणार आहेत.