Join us

सतारनवाझाला सलाम

By admin | Updated: January 16, 2017 02:17 IST

सतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान.

- अमरेंद्र धनेश्वरसतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. त्यापैकी पहिले दोघे अगोदरच काळाच्या पडद्याआड गेले. गेल्या आठवड्यात हलीम साहेबांचेही वृद्धापळाने निधन झाले. एक टोलेजंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना संगीत जगतात पसरली. हलीम साहेबांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत. त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. हलीम साहेबांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. खाँसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शारदा संगीत विद्यालयात (वांद्रे - पू.) सभा भरविण्यात आली होती. खाँसाहेबांच्या चाहत्यांनी या सभेला गर्दी केली होती. खाँसाहेबांवर आणि त्यांच्या संगीतावर अपार प्रेम करणारे सुशीलकुमार शिंदे, संगीतज्ञ एम.के. निगम, ‘शारदा’चे सुरेश नारंग, ओडिसी नर्तकी शुभदा वराडकर, सरोदवादक ब्रिजनारायण, सतारवादक राजेंद्र वर्मन आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारेख उपस्थित होतेच. खाँसाहेबांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. त्यांची चित्रपट संगीताच्या क्षेत्रातली कामगिरी अतुलनीय आहे. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले. खाँसाहेबांचे वाक्चातुर्य, त्यांची निर्विष विनोदबुद्धी आणि त्यांची अंगभूत सहिष्णुता या गुणांचेही वर्णन करण्यात आले.>सैगल युगातील रागदारी चित्रपट संगीतातील पूर्वसुरी म्हणजे कुंदनलाल सैगल. सैगल हा गायक नट होता. त्याच्या गायनशैलीचा प्रभाव लता मंगेशकरांपासून किशोरकुमारपर्यंत सर्वांवर पडला. त्यांच्या युगातील गीतांवर रागदारीचा कसा प्रभाव होता हे सप्रात्यक्षिक दाखविणारा कार्यक्र म सैगलच्या स्मृतिदिनी १८ जानेवारी रोजी संध्या. ६ वाजता नरिमन पॉइंटच्या यशंवतराव चव्हाण रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि समीक्षक प. अमरेंद्र धनेश्वर हा कार्यक्रम सादर करणार आहेत.