Join us  

सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 8:00 AM

या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे.

अभिनेता पुष्कर जोग बिग बॉस मराठी शोमध्ये झळकला. या शोचा उपविजेता ठरल्यापासून पुष्करला बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. लवकरच तो मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ती आणि ती या सिनेमात झळकणार आहे. इतकंच नाही तर पुष्कर एका मराठी सिंगलच्या व्हिडीओमध्येही पाहायला मिळणार आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने गायले असून त्याचे हे पहिलं मराठी गाणं असेल. या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे.

साई-पियूष यांनी या गाण्याला संगीत दिलं असून ते ऑस्ट्रेलियात चित्रीत करण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने वेगळी ओळख निर्माण केलेल्या सलीम-सुलेमान जोडीपैकी एक म्हणजे सलीम मर्चंट. हिंदीत आपल्या सूरांची जादू दाखवणाऱ्या सलीम यांच्याकडून मराठी गाणं म्हणजे संगीतप्रेमींसाठी एक ट्रीट म्हणावी लागेल.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहाताच तो डबिंग स्टुडिओत काढला असल्याचे लगेचच लक्षात येत आहे. त्याने या फोटोसोबत मी परत कामाला लागलो आहे. ती आणि ती या माझ्या चित्रपटासाठी मी नुकतेच चित्रीकरण केले असून पुढील अपडेट तुम्हाला लवकरच देईन असे लिहिले आहे.

पुष्करचा ती आणि ती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मृणाल कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे.  त्यामुळे पुष्कर प्रेक्षकांना लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती आणि ती या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहाणार यात काही शंकाच नाही. 

 

टॅग्स :ती अॅण्ड तीपुष्कर जोग