Join us  

...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:05 AM

...म्हणून रितेशने ठरवलं की मराठीत काम केलं पाहिजे, अभिनेत्याने सांगितलं यामागचं कारण

रितेश देशमुख हा सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. देशमुखांचा लेक असलेल्या रितेशने तुझे मेरी कसम या सिनेमातून २००३ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं. 'अपना सपना मनी मनी', 'हाऊसफुल', 'धमाल तेरे नाल लव्ह हो गया', 'एक व्हिलन' यांसारख्या हिंदी चित्रपटांत रितेश महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला.२०१४ साली 'लय भारी' सिनेमातून रितेशने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. विलासराव देशमुखांमुळे रितेशने मराठी सिनेमे करायचं ठरवलं असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने केला. 

रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि कुटुंब याबाबत भाष्य केलं. हिंदी सिनेमातून पदार्पण करत बॉलिवूडमध्ये जम बसवलेल्या रितेशची वडील विलासराव देशमुख यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली. रितेशची मुंबई फिल्म्स ही प्रॉडक्शन कंपनीही आहे. याद्वारे त्याने अनेक मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. यामागचं कारण त्याने मुलाखतीत सांगितलं. 

तो म्हणाला, "मराठीमध्ये मी फक्त माझ्या वडिलांसाठी आलो. मी हिंदी सिनेमांत काम करायचो तेव्हा माझे वडील म्हणायचे की तू हिंदी सिनेमांत काम करतोस. पण, मराठीत काय करणार आहेस? काही विचार केला आहेस का? खरं तेव्हा मी काहीच विचार केला नव्हता. मी जेव्हा मुंबई फिल्म कंपनी सुरू केली तेव्हा हिंदी सिनेमांची निर्मिती करू शकलो असतो. पण, मला वाटलं की मराठीत करूया. तेव्हा मराठी इंडस्ट्रीची एवढी चांगली ओळख आणि समज मला नव्हती. पण, उत्तम ठाकूर आणि रवी जाधव यांच्याबरोबर बालक पालक सिनेमाची निर्मिती केली". 

"पहिल्यांदा जेव्हा मी सिनेमाची निर्मिती केली तेव्हा ज्यांना याची माहिती होती त्यांच्याबरोबर काम केलं. दुसराही सिनेमा मी तसाच केला. मग लय भारी सिनेमावेळी मी अभिनेता असल्यामुळे सेटवर असायचो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला कळत गेल्या. मग फास्टर फेणेची निर्मिती केली. आणि त्यानंतर मग वेड सिनेमात मी स्वत: काम करत होतो. त्याचं दिग्दर्शनही मी केलं. मग या सिनेमाची निर्मिती पूर्णपणे मुंबई फिल्मने करायचं ठरवलं", असंही त्याने पुढे सांगितलं. 

टॅग्स :रितेश देशमुखमराठी अभिनेतासेलिब्रिटी