Join us  

ऋषी सक्सेना व रिचा अग्निहोत्री पहिल्यांदाच एकत्र, 'वक्रतुंड महाकाय' व्हिडिओ अल्बममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:30 PM

'वक्रतुंड महाकाय' अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे'वक्रतुंड महाकाय' अल्बमला स्वरसाज दिलाय अवधूत गुप्ते व आदर्श शिंदेने

'घाडगे & सून' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिचा अग्निहोत्री आणि अभिनेता ऋषी सक्सेना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे कोणत्या मालिकेत नाही तर एका व्हिडिओ अल्बममध्ये दिसणार आहेत. 'वक्रतुंड महाकाय' असे या अल्बमचे नाव असून यात हे दोघे दिसणार आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या काळात गणपतींवरील नवीन गाणी व अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तसाच एक गणपती बाप्पावर आधारीत व्हिडिओ अल्बम लवकरच पाहायला मिळणार आहे.'वक्रतुंड महाकाय' या अल्बममध्ये ऋषी सक्सेना व रिचा अग्नीहोत्रीसह निरंजन जोशी दिसणार आहे. रिचाने या व्हिडिओ अल्बमबद्दल सांगितले की, ऋषी आणि मी 'घाडगे & सून' या मालिकेमध्ये काम केले असले तरी सेटवर याआधी आम्ही कधीच भेटलो नाही. 'वक्रतुंड महाकाय' या म्युझिक अल्बमच्या निमित्ताने आम्ही भेटलो. ऋषी थोडा अबोल आहे आणि मी खूप गप्पिष्ट आहे. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला सुरुवात केली आणि आमची छान मैत्री झाली.  मी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले आहे आणि ऋषी नृत्य शिकला नसला तरी त्याला रिदम खूप छान कळतो. त्यामुळे शूटिंगच्या सुरुवातीला आम्हाला थोडा वेळ लागला पण नंतर आमचे मस्त ट्युनिंग जमले आणि आम्ही शूटिंगमध्ये खूप धमाल केली.वक्रतुंड महाकाय या अल्बममधील गाणी नचिकेत जोग यांनी लिहिली असून त्याला स्वरसाज अवधूत गुप्ते व आदर्श शिंदेने दिला आहे. तर संगीत सुहित अभ्यंकरने दिले आहे. या व्हिडिओ अल्बमचे दिग्दर्शन सागरिका दासने केले आहे. या गाण्यात ऋषी सक्सेनासह रिचा अग्नीहोत्री व निरंजन जोशी दिसणार आहे. या गाण्याची निर्मिती विक्स बँडने केली आहे. 

टॅग्स :घाडगे अँड सून