Join us  

Vanilla, Strawberry & Chocolate movie review: कथेत दम नसलेला चित्रपट

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 15, 2018 6:09 PM

व्हॅनिला, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी या चित्रपटात रवी काळे, राजश्री निकम, जानकी पाठक, क्षितीज देशपांडे आणि राधिका देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देव्हॅनिला, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी या चित्रपटाच्या कथेत काहीच दम नाहीये. त्यामुळे चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता लागत नाही.चित्रपटात रवी काळे, राजश्री निकम यांनी चांगला अभिनय केला आहे.या चित्रपटातील लोकेशन्स खूपच छान असून ती खूप चांगल्याप्रकारे कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत. चित्रपटाची सिनेमेटॉग्राफी चांगली झाली आहे.
Release Date: November 16, 2018Language: मराठी
Cast: रवी काळे, राजश्री निकम, जानकी पाठक, क्षितीज देशपांडे आणि राधिका देशपांडे
Producer: गिरीश विश्वनाथDirector: गिरीश विश्वनाथ
Duration: दोन तासGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राण्यांवर आजवर बॉलिवूड आणि मराठीत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. हाथी मेरे साथी यांसारख्या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यामुळे एखाद्या प्राण्यावर चित्रपट बनवणे यात काही नवीन नाही आणि त्यात कुत्रा हा तर अनेकांचा लाडका प्राणी, हा प्राणी तुम्हाला नकळतपणे लळा लावतात, तुमच्या आयुष्याचाच भाग बनून जातात. अशाच एका कुत्र्याची आणि मुलीच्या मैत्रीची कथा म्हणजे व्हॅनिला, चॉकलेट अँड स्ट्रॉबेरी...

तेजश्री (जानकी पाठक) ही दहावीत शिकणारी एक मुलगी असते. ती अभ्यासात प्रचंड हुशार असते. शाळेच्या आवारात असलेल्या एका कुत्रीसोबत (व्हॅनिला) तिची खूप छान मैत्री असते. ही व्हॅनिलाच तिचे विश्व असते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. व्हॅनिलाचे देखील तेजश्रीशिवाय पान हलत नसतं. तेजश्री शाळेत आली नाही तर ती दुःखी होत असते. व्हॅनिला ही एवढी गोड असते की तिचा लळा तेजश्रीची आई (राजश्री निकम), वडील (रवी काळे) आणि भाऊ चिनू (क्षितीज देशपांडे) यांना देखील लागलेला असतो. तेजश्री दहावीची तयारी करण्यात व्यग्र असते तर दुसरीकडे तिची बहीण मंजू (राधिका देशपांडे) गरोदरपणासाठी घरी आलेली असते. या सगळ्यात व्हॅनिला देखील गरोदर असल्याचे तेजूला कळते. पण एकदिवस अचानक व्हॅनिला गायब होते. व्हॅनिला तेजूला पुन्हा भेटते का, तिचे काय होते हे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

व्हॅनिला, चॉकलेट अँड स्ट्रॉबेरी या चित्रपटाच्या कथेत काहीच दम नाहीये. त्यामुळे चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता लागत नाही. चित्रपटात रवी काळे, राजश्री निकम यांनी चांगला अभिनय केला आहे. पण इतर कलाकारांच्या अभिनयात तितकी सहजता जाणवत नाही. तसेच चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये अनेक उणिवा आहेत. अनेक दृश्यं चित्रपटात उगाचच टाकल्यासारखी वाटतात. तसेच चित्रपट खूपच संथ आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण माथेरानमध्ये झाले आहे. या चित्रपटातील लोकेशन्स खूपच छान असून ती खूप चांगल्याप्रकारे कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत. चित्रपटाची सिनेमेटॉग्राफी चांगली झाली आहे. तेजू ही माथेरान या छोट्याशा गावातील असल्याचे चित्रपटाच्या लोकेशन आणि तिच्या वेशभूषेवरून कळून येते. पण तिच्या संवादांमुळे अथवा वावरण्यामुळे ती एखाद्या शहरातील मुलीसारखीच वाटते. तसेच तिच्यात आणि व्हॅनिलामध्ये असलेले घट्ट नाते दृश्यांमधून दिग्दर्शकाला तितकेसे मांडता आलेले नाही. त्यामुळे या दोघींच्या कथेत आपण गुंतत नाही, ती कथा आपल्याला आपलीशी वाटत नाही. 

टॅग्स :व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट