Join us  

Thappad movie review : समाजाच्या मानसिकतेला चपराक देणारा थप्पड

By प्राजक्ता चिटणीस | Published: February 28, 2020 3:32 PM

थप्पड या चित्रपटात तापसी पन्नू, पावेल गुलाटी, रत्ना पाठक, तन्वी आझमी, कुमूद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देएक कानाखाली मारली तर काय बिघडते असा विचार करणाऱ्या समाजाला चपराक देण्याचे काम थप्पड हा चित्रपट नक्कीच करतो.
Release Date: February 28, 2020Language: हिंदी
Cast: तापसी पन्नू, पावेल गुलाटी, रत्ना पाठक, तन्वी आझमी, कुमूद मिश्रा
Producer: अनुभव सिन्हा, कृष्ण कुमार आणि भुषण कुमारDirector: अनुभव सिन्हा
Duration: 2 तास 22 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

भारतात अनेक स्त्रियांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागते. नवऱ्याने बाईवर हात उचलला तर काय बिघडते असे केवळ तिच्या सासरची मंडळीच नव्हे तर माहेरची मंडळी देखील तिला ऐकवतात. आजही आपल्याकडे घरगुती हिंसाचाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि त्यात केवळ एखादी कानाखाली मारली म्हणून नवऱ्यासोबत घटस्फोट घेण्याचा विचार करणाऱ्या स्त्रीला तर केवळ एकच कानाखाली मारली होती त्यात काय... असेच ऐकावे लागते. घरगुती हिंसाचार याच नाजूक विषयावर भाष्य करणारा थप्पड हा सिनेमा आहे.

अमृता (तापसी पन्नू) एक पत्नी, सून अशा आपल्या सगळ्याच जबाबदाऱ्या खूपच चांगल्याप्रकारे पेलत असते. घरातील सगळी कामं करण्यापासून वडिलधाऱ्यांची सेवा करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी ती करत असते. तिचा पती विक्रम (पावेल गुलाटी) आणि तिच्यात खूपच चांगले नाते असते. पण विक्रम कंपनीत प्रमोशन न मिळाल्याचा राग एका पार्टीत तिच्यावर काढतो आणि चारचौघात तिच्या कानाखाली मारतो. येथे खऱ्या अर्थाने या चित्रपटाला सुरुवात होते. सगळ्यांची सेवा करणाऱ्या, सगळे निमुटपणे ऐकून घेणाऱ्या अमृताच्या स्वाभिमानाला या कानाखालीमुळे ठेच लागते. या नात्यात आता राहाण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून ती घटस्फोट घेण्याचे ठरवते. पण एका कानाखालीमुळे काय बिघडते ही गोष्ट तिच्या घरातील स्त्रिया देखील तिला ऐकवतात. एवढेच नव्हे तर तिची वकील देखील तिला या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करायला सांगते. या सगळ्यातून अमृता काय निर्णय घेते. ती या नात्यातून बाहेर पडते का या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

घरगुती हिंसाचार हा विषय थप्पड या चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे मांडण्यात आला आहे. अमृताच्या कथेसोबतच या चित्रपटात तिच्या मोलकरणीची, वकिलाची, तिच्या होणाऱ्या वहिनीची अशा विविध स्त्रियांच्या उपकथा देखील चित्रपटात पाहायला मिळतात. आपल्या अस्तित्वाचा, स्वतःचा विचार करणाऱ्या स्त्रीची ही कथा मनाला स्पर्श करून जाते. चित्रपटाची कथा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने चांगल्याप्रकारे मांडली आहे. केवळ चित्रपट सुरुवातीला खूपच संथ वाटतो. अमृताने रोजच्या त्याच त्याच गोष्टी करताना सतत दाखवणे याचा काही काळानंतर कंटाळा येतो. चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत काहीच घडत नसल्याचे जाणवते. तसेच चित्रपट काहीसा ताणल्यासारखा वाटतो. पण मध्यांतरानंतर चित्रपटाला खऱ्या अर्थाने गती मिळते. 

तापसी पन्नूने या चित्रपटातील अमृता ही भूमिका अक्षरशः जगली आहे. या भूमिकेसाठी तिचे किती कौतुक करावे तितके कमी आहे. तिच्या पतीच्या भूमिकेत असलेला पावेल हा नवोदित अभिनेता असला तरी त्याच्या अभिनयात हे कुठेच जाणवत नाही. तसेच रत्ना पाठक, तन्वी आझमी, कुमूद मिश्रा, निधी उत्तम यांनी देखील त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. केवळ दिया मिर्झाच्या वाट्याला छोटीशीच भूमिका आली आहे. चित्रपटात गाण्यांचा भडिमार न करता केवळ दृश्यांच्या गरजेनुसार एक तुकडा धूप हे एकच गाणे वापरण्यात आले आहे. हे गाणे मस्त जमून आले आहे. 

एक कानाखाली मारली तर काय बिघडते असा विचार करणाऱ्या समाजाला चपराक देण्याचे काम थप्पड हा चित्रपट नक्कीच करतो.

टॅग्स :थप्पडतापसी पन्नू