Join us  

Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:03 PM

‘सुई धागा’ या चित्रपटाची समीक्षा करायची झाल्यास शॉर्ट, स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल हे तीन शब्द पुरेसे आहेत. स्वावलंबन, आत्मसन्मान अशा फार नाजूक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो.

Release Date: September 28, 2018Language: हिंदी
Cast: अनुष्का शर्मा, वरूण धवन, रघुवीर यादव
Producer: यश राज फिल्म्स Director: शरत कटारिया
Duration: 2 तास 16 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- जान्हवी सामंत

‘सुई धागा’ या चित्रपटाची समीक्षा करायची झाल्यास शॉर्ट, स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल हे तीन शब्द पुरेसे आहेत. स्वावलंबन, आत्मसन्मान अशा फार नाजूक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो.ममता आणि मौजी या जोडप्याची ही कथा.  मौजी हा मालकावर निष्ठा असलेला, त्याचा प्रत्येक शब्द अलगद झेलणारा, कधी कुत्रा बनून तर कधी माकड बनून मालकाचे मनोरंजन करणारा एक प्रामाणिक विश्वासू नोकर असतो. मालक आपल्याला पैसे देतो आणि त्याची चाकरी करणे हेच आपले नशीब आहे, हेच तो मानून चालतो. पण त्याची पत्नी बनून घरात आलेल्या ममताला मात्र ही अशी चाकरी मान्य नसते. आपल्या नव-याचा पदोपदी होणारा अपमान तिला असह्य होतो. मालकाची चाकरी सोडून त्याने आत्मसन्मानाने जगावे, अशी तिची इच्छा असते. पण मौजी आणि त्याच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांना मात्र नोकरी हेच सर्वस्व वाटत असते. याऊलट मौजीने आपल्यातील कलेचा, शिवणकामाचा वापर करून स्वत:चा एक छोटासा व्यवसाय सुरू करावा, अशी ममताची धडपड असते. ममताची ही धडपड मार्गी लागते आणि मौजी नोकरी सोडून शिलाईमशीन घेऊन आपले स्वत:चे दुकान थाटतो. रूग्णालयात भरती असलेल्या आपल्या आईला तो गाऊन शिवून देतो आणि हा गाऊन बघून मौजीकडे खूप आॅडर्स येतात. पण मौजी अन् ममता मार्ग सोपा नसतोच. या मार्गात पुढे अनंत अडचणी वाढून ठेवलेल्या असतात. कधी मशीन नाही, कधी भांडवल नाही़ एकदा तर त्यांचे डिझाईन दुसरे कुणीतरी चोरते. हे सगळे अडथळे पार करून ममता व मौजी आपला स्वत:चा मार्ग कसा तयार करतात, अशी ‘सुई धागा’ची गोष्ट आहे.चित्रपट अगदी साधा-सरळ आहे़ कुठलीही ड्रामेबाजी नाही, कुठलीही डायलॉगबाजी नाही की कुठलेही उपदेश नाहीत. आपल्या याच साधेपणामुळे हा चित्रपट मन जिंकतो. अतिशय वास्तववादी रूपात हा चित्रपट कथेचे सार सांगून जातो.

ममता आणि मौजी या मध्यवर्ती पात्रांभोवती चित्रपटाची संपूर्ण कथा गुंफली गेली आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष पडद्यावर बघताना आपण रमून जातो. निश्चितपणे याचे सगळे श्रेय वरूण धवन आणि अनुष्का शर्माला द्यायला हवे. प्रत्यक्षात अतिशय विजोड भासणा-या अनुष्का व वरूणची पडद्यावरची केमिस्ट्री अफलातून आहे. शांत पण तितकीच कणखर ममता आणि प्रेमळ व भोळा मौजी या दोन्ही व्यक्तिरेखा दोघांनीही कमालीच्या ताकदीने जिवंत केल्या आहेत. अन्य व्यक्तिरेखाही तितक्याही रंगवल्या आहेत. मौजीचे वडील, त्याची आई, भाऊ, गुड्डू भैय्या ही सगळी पात्रेही प्रचंड मनोरंजक आहेत. यासाठी दिग्दर्शकाचे कौतुक केलेच पाहिजे. एक साधी गोष्ट तितक्याच साधेपणाने खुलवत नेणे, यातचं दिग्दर्शकाचे कसब असते. दिग्दर्शक शरत कटारिया या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरले आहेत. एकंदर काय तर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. 

टॅग्स :सुई-धागाअनुष्का शर्मावरूण धवन