Join us  

Pushpak Vimaan review : भरकटलेले पुष्पक विमान

By प्राजक्ता चिटणीस | Published: August 02, 2018 6:04 PM

पुष्पक विमान या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Release Date: August 03, 2018Language: मराठी
Cast: मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन
Producer: मंजिरी सुबोध भावे, सुनील फडतरे, अरुण जोशी, मुकेश पाटीलDirector: वैभव चिंचाळकर
Duration: २ तास १३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

पुष्पक विमान या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट विमानाशी संबंधित असल्याचे आपल्याला लगेचच लक्षात येते. खेडेगावात राहाणाऱ्या लोकांना आजही विमानाविषयी आकर्षण आहे. आपल्याला एकदा तरी या विमानात बसायला मिळावे अशी त्यांची इच्छा असते. आपल्या आजोबांची विमानात बसण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या एका नातवाची गोड गोष्ट म्हणजे पुष्पक विमान... आजोबा आणि नातवंडात असलेले नाते या चित्रपटाद्वारे खूपच चांगल्याप्रकारे मांडण्यात आलेले आहे.

तात्या (मोहन जोशी) गावात एकटेच राहात असतात. वयानुसार त्यांना विस्मरण होत असते. पण तरी देखील दररोज ते बस स्टॉपवर जाऊन आपल्या नातवाची आतुरतेने वाट पाहात असतात. आपला नातू आपल्याला भेटायला नक्कीच येईल याची त्यांना खात्री असते. एकदा अचानक त्यांचा नातू विलास (सुबोध भावे) गावात येतो. आपल्या आजोबांसोबत काही दिवस गावात राहिल्यानंतर तो आजोबांना मुंबईला घेऊन जातो. पण मुंबईतील छोट्याशा घरात राहाणे त्यांच्यासाठी खूपच कठीण जाते. त्यात त्यांची नातसून स्मिता (गौरी महाजन) सोबत त्यांचे पटत नसते. तिला ते सतत टोमणे मारत असतात. मुंबईचे जीवन त्यांना आवडत नसल्याने त्यांना लवकरात लवकर पुन्हा गावी जायचे असते. गावी जाण्यासाठी ते निघायचा विचार देखील करतात. पण त्याच दिवशी ते आकाशात भलंमोठं विमान पाहातात. हे विमान म्हणजेच संत तुकारामांचेच पुष्पक विमान असल्याची त्यांना खात्री पटते आणि या विमानात प्रवास करण्यासाठी ते नातवंडाकडे हट्ट करतात. त्यानंतर त्यांचा प्रवास होतो का? या प्रवासात किती अडचणी येतात? हे आपल्याला पुष्पक विमान या चित्रपटात पाहायला मिळते.

पुष्पक विमान या चित्रपटाची कथा ही चांगली असली तरी ती दिग्दर्शकाला तितकीशी मांडता आलेली नाही. या कथेत अनेक उपकथा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत तर काहीच घडत नाही. मध्यांतरानंतर चित्रपटाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पण मध्यांतरानंतर चित्रपट इतका लांबवला आहे की, चित्रपट प्रचंड कंटाळवाणा होतो. तसेच चित्रपटातील काही गाणी चांगली असली तरी सतत येत असलेली गाणी काही काळानंतर नकोशी होतात. मुंबईतील चाळीतील वातावरण, आजूबाजूचा परिसर दिग्दर्शकाने चांगल्या प्रकारे दाखवला आहे. चाळीतील सगळ्याच व्यक्तिरेखा या चांगल्याच लक्षात राहातात. मोहन जोशी मुंबईतील सार्वजनिक शौचालयात जातात, तसेच मॉलमधील प्रसंग, विमानतळावरील त्यांचे दृश्य मस्त जमून आलेले आहे. पुष्पक विमान खऱ्या अर्थाने तारला आहे तो मोहन जोशी यांनी. मोहन जोशी यांनी तात्या अप्रतिम रंगवला आहे. त्यांच्या अभिनयाचे करावे तितके कौतुक कमीच. त्यांना सुबोध भावेने देखील चांगली साथ दिली आहे. गौरीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी काही दृश्यांमधील तिचा अभिनय चांगला झाला आहे. पण काही दृश्यांमध्ये तिच्या अभिनयात सहजता जाणवत नाही. सुयश झुंझुरकेने देखील फिरोज ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारली आहे. पण तुकारामांच्या भूमिकेत राहुल देशपांडे भावत नाही.  

टॅग्स :पुष्पक विमान चित्रपटमोहन जोशीसुबोध भावे