प्रमुख नसलेल्या समाजाचे स्वप्न पाहणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान विचारांची आणि संघर्षाची ही गाथा आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी पाठ्यपुस्तकातून बाहेर काढून फुलेंना चित्रपटाद्वारे जगासमोर आणले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षांनी आजही फुलेंचा लढा संपलेला नसून, रुपेरी पडद्यावर येण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.
कथानक : 'संसाराच्या नावे घालूनियां शून्य। वाढता हा पुण्य धर्म केला।।' या संतवचनानुसार स्वत:च्या संसाराचा विचार न करता समाजरूपी संसाराच्या हितासाठी झटणाऱ्या फुलेंची ही कथा आहे. इंग्रजांविरोधातील स्वातंत्र्य लढ्यासोबतच कथा पुढे सरकत राहते. बालपणी वडीलांकडून मिळालेल्या विचारांच्या बाळकडूमुळे तरुणपणी फुले यांचा खरा संघर्ष सुरू होतो. मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या ज्योती-सावित्रीला एका ब्राह्मणाघरी शाळेसाठी जागा मिळते, पण तिथेही विरोध होतो. फुलेंवर प्राणघातक हल्ले होतात, मानहानी केली, गाईचे शेण फेकले, तरीही समाजसेवेचा महायज्ञ अखंडीतपणे सुरू ठेवण्यासाठी झटणाऱ्या फुलेंची धगधगत्या निखाऱ्यासारखी गोष्ट या चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : फुलांची शेती करणाऱ्या कुटुंबात जन्मल्याने फुले आडनाव मिळाल्यानंतर आपल्या कर्माच्या बळावर ते सत्य असल्याचे सिद्ध करत समाजातील जाचक रुढी परंपरांना मूठमाती देणाऱ्या फुलेंची ही गाथा आहे. पटकथा-संवाद छान आहेत. मुलींनी शिक्षण घेतले तर घरकाम कोण करणार? अशा विचारांच्या लोकांनी त्यांना विरोध केला. फुलेंनी मात्र दलितांच्या लग्नात मंत्र म्हणत जाती-वर्णभेदालाच सुरुंग लावला. सत्यशोधक समाजाची स्थापना करत केवळ दलितांनाच नव्हे, तर इतर मागसवर्गीयांना एकाच मंचावर आणले. अस्पृश्यांना, विधवांना, त्यांच्या मुलांना सन्मानजनक वागणूक मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. मोहनदास गांधींच्या अगोदरही ज्यांना महात्मा ही पदवी दिली गेली त्या फुलेंच्या कार्याची महती तरुणाईपर्यंत पोहोचवणाऱ्या महादेवन यांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. 'साथी...' गाणे श्रवणीय असून भावूक करते.
अभिनय : ज्योतिबा-सावित्रीबाईंच्या व्यक्तिरेखांना प्रतिक गांधी आणि पत्रलेखाखेरीज अन्य कोणतेही कलाकार इतक्या सुरेखरीत्या न्याय देऊ शकले नसते असे वाटावे अशाप्रकारे दोघांनी आपापल्या भूमिका सजीव केल्या आहेत. दोघांनीही झोकून देऊन काम केले आहे. विनय पाठकने फुलेंच्या वडीलांच्या, तर सुशील पांडेने भावाच्या भूमिकेत सुरेख रंग भरले आहेत. अक्षया गुरवने साकारलेली फातिमा शेख आणि जयेश मोरेचा उस्मान शेखही झकास आहे. दर्शील सफारीने दत्तक मुलाची भूमिका चांगली केली आहे. इतर कलाकारांनी सहाय्यक भूमिकेत छान काम केले.
सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, संकलननकारात्मक बाजू : बोलीभाषाथोडक्यात काय तर राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्यासाठी सक्षम असलेला हा चित्रपट जाती, धर्म, वर्ण भेद बाजूला ठेवून एका महात्म्याचा संघर्ष जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य पाहायला हवा.