Join us  

मनोरंजनाच्या ट्रॅकवरून घसरलेल्या एक्सप्रेसची सफर, 'मडगाव एक्सप्रेस' सिनेमाचा रिव्ह्यू वाचा

By संजय घावरे | Published: March 22, 2024 4:32 PM

कुणाल खेमूच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'मडगाव एक्सप्रेस' कसा आहे?

Release Date: March 22, 2024Language: हिंदी
Cast: दिव्येंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये, छाया कदम, उमेश जगताप, रमाकांत कांदे
Producer: रितेश सिधवानी, फरहान अख्तरDirector: कुणाल खेमू
Duration: २ तास २३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

असं कुठे होतं का? असा प्रश्न हा चित्रपट पाहताना वारंवार मनात येतो, पण चित्रपटात सारखं तसंच काहीसं घडत रहातं. कुणाल खेमूच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा पहिला चित्रपट आहे. हास्य-रहस्याची सफरीवर नेणारी हि एक्सप्रेस मनोरंजनाच्या ट्रॅकवरून मात्र घसरली आहे.

कथानक : डोडो, पिंकू आणि आयुष या तीन मित्रांची ही कथा आहे. ग्रॅज्युएट झाल्यावर तिघे बालपणापासूनचं स्वप्न साकार करण्यासाठी गोव्याला जायला निघतात. त्यांच्या गाडीला अपघात होतो. त्यानंतर पिंकू केपटाऊनला आणि आयुष न्यूयॅार्कला जातो. डोडो मुंबईतच चाळीत राहातो. पिंकू आणि आयुष श्रीमंत बनतात, डोडो गरीबच राहातो. सोशल मीडियावर मात्र आपल्या मित्रांना तो श्रीमंत असल्याचं भासवतो. पिंकू आणि आयुष भारतात येण्याचं ठरवतात तेव्हा डोडो गोव्याला जाण्याचा प्लॅन आखतो. त्यानंतर त्या तिघांसोबत काय घडतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन :कुणाल खेमूने दोन्ही केकेल्याने चित्रपटातील उणीवांसाठी तोच जबाबदार आहे. आजवर बऱ्याचदा पाहिलेली कथा पदार्पणासाठी निवडणं हि कुणालची सर्वात मोठी चूक आहे. चित्रपट सुरू झाल्यापासून ज्या काही गोष्टी घडतात त्या कुठे ना कुठे पाहिलेल्या वाटतात. बॅगांची अदलाबदल होणं, नायकांच्या घरी ड्रग्ज मिळणं, नायकांच्या मागे दोन गँग लागणं, पोलिसही त्यांच्याच मागावर असणं हे सर्व बऱ्याचदा पाहिलं आहे. लेडी डॅान गॅगची कॅान्सेप्ट आणि दुसरा गँगचा लीडर तिचा नवरा असणं ही संकल्पना काहीशी नवीन आहे. गोव्यातील निसर्गसौंदर्य पडद्यावर खुलवता आलेलं नाही. गीत-संगीत तसेच पार्श्वसंगीत चांगलं आहे.

अभिनय : दिव्येंदूचं विनोदी टायमिंग अफलातून आहे. प्रतीक गांधीच्या अभिनय कौशल्याचा वेगळा रंग यात पाहायला मिळतो. अविनाश तिवारीनेही आपल्या कॅरेक्टरला न्याय देत हसवण्याचं काम केलं आहे. कंचन कोंबडीच्या भूमिकेत मराठमोळ्या गेटअपमध्ये छाया कदम भाव खाऊन गेली आहे. उपेंद्र लिमये पुन्हा एकदा काहीशा 'अॅनिमल' शैलीत दिसला, पण त्याने साकारलेला मेंडोझा लक्षात राहण्याजोगा आहे. नोरा फतेही उत्तम डान्सर असली तरी तिला अभिनयाची बाराखडी शिकावी लागेल. उमेश जगताप आणि रमाकांत कांदे यांनीही चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, गीत-संगीत, वेशभूषा, विनोद निर्मिती, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, संवाद, सिनेमाची गतीथोडक्यात काय तर हा चित्रपट मुंबई ते गोवा प्रवासाचा खरा आनंद देणारा नसला तरी हास्य-रहस्याची सफर घडवणारा असल्याने एक चान्स घ्यायला हरकत नाही.

टॅग्स :कुणाल खेमूसिनेमा