Join us  

luka chuppi Movie Review:लिव्ह इनचा ड्रामा, कॉमेडीचा धमाका

By सुवर्णा जैन | Published: March 01, 2019 3:10 PM

लिव्ह इन रिलेशनशिपचा धागा पकडत लुकाछिपी चित्रपटाची कथा काहीशा विनोदी पद्धतीने गुंफण्यात आली आहे.

Release Date: March 01, 2019Language: हिंदी
Cast: कार्तिक आर्यन, क्रिती सॅनन, अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी
Producer: दिनेश विजनDirector: लक्ष्मण उतेकर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

'लिव्ह इन रिलेशनशिप'.. आजच्या युगातील बिनधास्त तरुणाईला काहीच वावगं न वाटणारा असा विषय. लिव्ह इन म्हणजेच एकप्रकारे कोणत्याही लायसन्सविना लग्न किंवा एकमेंकांना समजून घेण्यासाठी दिलेली संधी असंही म्हणता येईल. हाच लिव्ह इन रिलेशनशिपचा धागा पकडत लुकाछिपी चित्रपटाची कथा काहीशा विनोदी पद्धतीने गुंफण्यात आली आहे. लुकाछिपी ही कथा आहे मथुरामधल्या एका स्थानिक टीव्ही पत्रकार गुड्डूची (कार्तिक आर्यन) जो एक कट्टर हिंदुत्ववादी नेत्याच्या मुलीच्या म्हणजेच रश्मी त्रिवेदी (क्रिती सॅनन) हिच्या प्रेमात पडतो.

गुड्डू एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तर रश्मी उच्चशिक्षित, बिनधास्त अशी तरुणी. मात्र या गुड्डू-रश्मीच्या जीवनात ट्विस्ट येतो ज्यावेळी गुड्डू रश्मीला लग्नाची मागणी घालतो. मात्र मॉर्डन विचारांची रश्मी लग्नाच्या जबाबदारीसाठी तयार नसते. त्यामुळे एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी ती गुड्डूसमोर लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवते. एकीकडे रश्मीचे वडील(विनय पाठक) कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे नेते, ज्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेमीयुगुलांनी भेटणे मान्य नाही, तिकडे रश्मी गुड्डूपुढे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवते. 

चित्रपटाच्या कथेची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप काय ते अनोख्या पद्धतीने छोट्या छोट्या प्रसंगातून दाखवण्यात आलं आहे. सर्वात म्हणजे लुकाछिपी हा चित्रपट डोकं बाजूला ठेवून सादर करण्यात आलेली कॉमेडी नाही. दररोजच्या किंवा नित्यनियमाने आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांवर कोणतंही राजकीय भाष्य न करता परखडरित्या मांडण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ एखादी नववधू लग्न झाल्यावर माहेरचा निरोप घेताना भावुक होते त्याप्रमाणे लिव्ह इनमध्ये जाण्याआधी गुड्डूची अवस्था दाखवण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे त्यावेळी 'हम आपके हैं कौन' चित्रपटातील ''बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घर मैं चली '' या गाण्याच्या ओळी बॅकग्राउंडला सुरू असतात. हा सीन पाहून रसिक पोट धरुन हसू लागतात. दुसऱ्या एका सीनमध्ये गुड्डूची आई आपला लेक घरातली सगळी कामं करणारा नवरा तर सून कामानिमित्त घराबाहेर पडते हे खुल्या दिलाने स्वीकारते. मात्र ही बाब गुड्डूच्या असंतुष्ट वहिनीला रुचत नाही. या माध्यातून समाजाची मानसिकता दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. 

कार्तिक आर्यनने दमदाररित्या साकारलेला गुड्डू रसिकांना खिळवून ठेवतो. दुसरीकडे क्रिती सॅनन हिनं मॉर्डन विचारांची बिनधास्त रश्मी मोठ्या खुबीने साकारली आहे. अपारशक्ती खुराणाने साकारलेला गुड्डूचा मित्र आणि कॅमेरामन तितकाच उत्कृष्ट वाटतो. गुड्डू-रश्मी आणि कॅमेरामनची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. विनय पाठकने साकारलेला कट्टर हिंदुत्ववादी नेता रसिकांना नक्कीच भावेल. या सगळ्यांमध्ये भाव खाऊन जातो तो अभिनेता पंकज त्रिपाठी. हा कलाकार काहीच चुकीचं करु शकत नाही असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याला आधी रसिकांनी मार्मिक कॉमेडी करताना पाहिलंय. मात्र या चित्रपटात तर त्याने अक्षरक्ष: धम्माल उडवलीय. विदूषकाप्रमाणे तो या भूमिकेतून रसिकांना वेड लावेल. चित्रपटाचं संगीत चांगलं आहे. विशेष म्हणजे ''पोस्टर लगवा दो'' या गाण्यात क्रिती, कार्तिकचा अंदाज जबरदस्त वाटतो. इतर गाणीही थिरकायला भाग पाडतात. 

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा प्रयत्न समाधानकारक म्हणावा लागेल. संवादलेखकाच्या काही अफलातून संवादांनी चित्रपटाच्या कथेत जान आणली आहे. या चित्रपटातून दिग्दर्शकाने हिंदू संस्कृती रक्षक म्हणवून घेणाऱ्या तथाकथित मंडळींना जोरदार चपराक लगावण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचं कौतुक व्हायला हवं. मात्र त्याची मांडणी करताना दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. कारण चित्रपटातील अनेक मुद्दे हसण्यावारी नेण्यासारखे झाले आहेत. तुम्हाला निखळ मनोरंजन हवं असेल आणि तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर 'लुकाछिपी' उत्तम पर्याय ठरू शकतो. 

टॅग्स :लुका छुपीक्रिती सनॉनकार्तिक आर्यन