Join us  

Jabariya Jodi Movie Review : भरकटलेला 'जबरिया जोडी'

By तेजल गावडे | Published: August 09, 2019 3:26 PM

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

Release Date: August 09, 2019Language: हिंदी
Cast: परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, संजय मिश्रा, जावेद जाफरी व अपारशक्ती खुराना
Producer: एकता कपूर, शोभा कपूर, शैलेश आर सिंगDirector: प्रशांत सिंग
Duration: २ तास १८ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

 

- तेजल गावडे

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. जबरिया जोडी या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट जबरदस्तीनं बनवलेल्या जोडीवर आधारीत असल्याचं आपल्या लक्षात येतं. पण, या चित्रपटाची कथा वास्तविक मुद्द्यावर आधारीत असून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये होणाऱ्या पकडवा शादी म्हणजेच जबरदस्ती लग्न प्रथेवर आधारीत आहे. 

जबरिया जोडी चित्रपटाची कथा बबली यादव (परिणीती चोप्रा) व अभय सिंग (सिद्धार्थ मल्होत्रा) यांच्याभोवती फिरते. बबली व अभय यांचं बालपणी एकमेकांवर प्रेम असतं. मात्र बबली शहरात शिफ्ट झाल्यावर ते अपूर्ण राहतं. मोठे झाल्यानंतर बबली कॉलेजमध्ये शिकत असते तर अभय सिंग जबरदस्ती लग्न लावायचे काम करत असतो. जबरदस्ती लग्नाची खासियत म्हणजे हुंड्यामुळे लग्न न करता येणाऱ्या मुलाच्या नकळत त्याचं लग्न लावून दिलं जातं. बबलीची मैत्रीण पकडवा विवाह करत असते आणि तिच्या लग्नात बबलीची भेट अभयशी होते. पहिल्यात नजरेत ते दोघं एकमेकांना ओळखतात. बबलीचं बालपणीचं प्रेम जागं होतं. पुन्हा ती अभयच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासोबत तिला लग्न करायचं असतं. मात्र अभयला आगामी निवडणुकीत आमदार व्हायचं असतं. त्यामुळे तो प्रेम व लग्नापासून दूर पळत असतो. कारण अभयला वाटत असतं की, त्याचे वडील हुकुम देव सिंग(जावेद जाफरी) त्याच्या आईचा नीट सांभाळ करू शकले नाहीत आणि तोदेखील त्याच्या वडीलांसारखा बनला असून तोदेखील बबलीचा सांभाळ करू शकत नाही. पण कुठंतरी अभयच्या मनातही बबलीबद्दल प्रेम असतं. मात्र कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा बबलीचे वडील पकडवा विवाह (जबरदस्ती लग्न) करण्यासाठी अभयच्या वडिलांकडे जातात. पण, पैशांमुळे बबलीचं लग्न तुटतं. त्यादरम्यान बबलीला समजतं की अभयचं तिच्यावर प्रेम नाही. त्यानंतर भडकलेली बबली हजारो जबरदस्ती लग्न लावणाऱ्या अभयचं अपहरण करते आणि तो शुद्धीत नसताना त्याच्यासोबत जबरदस्ती लग्न करते. जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बबली पाठवते. ज्यात ती सांगते की, मी तुझ्यासोबत फक्त सहा फेरे घेतले आहेत. पण, लग्न सात फेऱ्यांशिवाय अपूर्ण आहे. त्यानंतर बबली अभय सिंगला प्रेमाची जाणीव करून देते की नाही, हे पाहण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.

जबरिया जोडी चित्रपट बिहारमधील पकडवा विवाह प्रथेचा गंभीर मुद्दा हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रशांत सिंग यांनी केला आहे. या प्रथेच्या माध्यमातून हुंडा घेणाऱ्या वराला त्याच्या नकळत त्याचे नाकारलेल्या मुलीशी लावून दिलं जातं आणि शिक्षा दिली जाते, हे पुर्वाधात दर्शविले आहे. त्यामुळे हुंड्यासारख्या वाईट प्रथेविरोधात संदेश देत असल्याचं वाटत असताना उत्तरार्धात जबरदस्ती लग्न लावून देणं योग्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे ही गोष्ट कुठंतरी खटकते. चित्रपटाचा विषय चांगला असला तरीदेखील लेखकाला तो नीट मांडता आला नाही. त्यामुळे चित्रपट भरकटलेला जाणवतो. मात्र कथेतील लव्हस्टोरी अखेरीस मनाला भावते. या चित्रपटातील काही डायलॉग्स चांगले आहेत. जे प्रेक्षकांना हसायला भाग पाडतात. चित्रपटाची लांबी उगाच वाढविल्यासारखी वाटते. दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफरने त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. तसेच चित्रपटातील 'कि होंदा प्यार', 'ख्वाबफरोशी' व 'धुंडे अखियां' ही गाणी खूप छान झाली आहेत. अभिनयाबद्दल सांगायचं तर सिद्धार्थ मल्होत्राने पहिल्यांदा बिहारी युवकाची भूमिका साकारली असून तो या भूमिकेत अगदी फिट बसला आहे. तर परिणीती चोप्रा या चित्रपटातून पुन्हा एकदा बिनधास्त मुलीची भूमिका केली आहे आणि तिने ही भूमिका अगदी सहजतेनं साकारली आहे. तसेच आतापर्यंत जावेद जाफरी विनोदी भूमिकेत जास्त पहायला मिळाला आहे. पण, या चित्रपटात त्याने निगेटिव्ह भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.  याशिवाय संजय मिश्रा, अपारशक्ती खुराणा या कलाकारांनीदेखील खूप चांगला अभिनय केला आहे. पकडवा विवाह या प्रथेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा परिणीती व सिद्धार्थची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी हा चित्रपट पहा.   

टॅग्स :जबरिया जोडीसिद्धार्थ मल्होत्राजावेद जाफरीपरिणीती चोप्रा