Join us  

kanni review: विदेशात राहण्यासाठी धडपडणाऱ्या 'कन्नी'ची संघर्षकथा

By संजय घावरे | Published: March 08, 2024 2:41 PM

kanni review: वडिलांच्या पश्चात आपली स्वप्नं साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीच्या संघर्षाची कहाणी

Release Date: March 08, 2024Language: मराठी
Cast: हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज, ऋषी मनोहर
Producer: अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानीDirector: समीर जोशी
Duration: 2 तास 2 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

जागतिक महिला दिनी प्रदर्शित झालेल्या या नायिकाप्रधान चित्रपटात नायिकेची लव्हस्टोरी आणि तिचा संघर्ष आहे. परदेशी जाण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा तिथं राहण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रगल करावा लागतो याची झलकही यात पाहायला मिळते. दिग्दर्शक समीर जोशी यांनी 'कन्नी'च्या अंत:र्बाह्य संघर्षाची कहाणी सादर केली आहे.

कथानक : 'आपला पतंग चंद्राच्या शेजारी', असं म्हणत आकाशात उंच उडून स्वत:ची आणि कुटुंबाची स्वप्नं साकार करण्यासाठी लंडनमध्ये गेलेल्या कल्याणी रेवंडीकर म्हणजेच कन्नीची ही कथा आहे. सोहम, निशा आणि भूषण या तीन मित्रांसोबत कन्नी राहात असते. भारतात तिच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या काकांना मात्र तिचं लग्न लावून द्यायचं आहे. व्हिजा संपत आला असल्याने कन्नीला एका नोकरीची गरज असते. नोकरी मिळाल्यास तिला व्हिजा मिळणार असतो. अपॅाईंटमेंट लेटर मिळतं, पण कन्नीला नोकरी काही मिळत नाही. त्यामुळे मित्रांच्या मदतीने ती एक शक्कल लढवते. त्यानंतर तिला काय काय करावं लागतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन चांगली असली तरी पटकथा खुलवताना काही मनोरंजक-रोमांचक प्रसंगांचा समावेश करण्याची गरज होती. पटकथा अनपेक्षित नाट्यमय वळणं घेत असली तरी गती संथ असल्याने उत्सुकता वाढवण्यात कमी पडते. प्रेम आणि मैत्रीतील काही प्रसंगानुरूप संवाद अर्थपूर्ण असून, भावूकही करतात. व्हिजा वाढवण्यासाठी लग्न करून तिथेच राहण्याचा मुद्दा नीट पटवून देता आलेला नाही. प्रसंगानुरूप विनोदनिर्मितीही फार कमी आहे. मैत्रीतील काही क्षण खूप चांगले कॅश करण्यात आले आहेत. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या जोडीची केमिस्ट्री खुणावते. मित्राच्या मनातील प्रेमाचा वेगळा पैलू सादर करण्यात आला आहे. 'नवरोबा नवरोबा...' हे गाणं चांगलं झालं आहे. इतर गाणी सामान्यच आहेत. 

अभिनय : हृता दुर्गुळेने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंगानुरूप अभिनय करण्याची कला तिला चांगली जमते. अजिंक्य राऊतने लंडनमध्ये राहणारा मराठमोळा तरूण अभिनय आणि बोलीभाषेद्वारे अचूक साकारला आहे. शुभंकर तावडेने साकारलेला नायक खऱ्या अर्थाने वेगळा असून, त्याने तो छान रंगवला आहे. वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर या दोघांनीही मित्रांच्या भूमिकेत जीव ओतला आहे. सहाय्यक भूमिकांमध्येही त्यांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे. याचा दोघांनाही भविष्यात नक्कीच फायदा होईल.

सकारात्मक बाजू : कथा, संवाद, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स, गेटअप्स 

नकारात्मक बाजू : पटकथा, सिनेमाची गती, संकलन

थोडक्यात काय तर वडिलांच्या पश्चात आपली स्वप्नं साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीच्या संघर्षाची ही कहाणी वेळ असल्यास एकदा पाहायला हरकत नाही.

टॅग्स :सिनेमाऋता दूर्गुळेसेलिब्रिटी