Join us  

Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga Movie Review - चाकोरीबाहेरील बोल्ड प्रेमकथा

By सुवर्णा जैन | Published: February 01, 2019 3:35 PM

'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' यानंतर सोनम कपूरची ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातील स्वीटी भलतीच भाव खावून जाते. अनिल कपूर यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे.

Release Date: February 01, 2019Language: हिंदी
Cast: सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव, रेजीना कसांड्रा, जुही चावला
Producer: विधु विनोद चोपडाDirector: शैली चोपडा
Genre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

 

हिंदी चित्रपटसृष्टीत हटके आणि तितकाच बोल्ड विषयावर आधारित चित्रपट घेऊन येणारे मोजके दिग्दर्शक असतात. चाकोरीबाहेरील चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच काहीसा प्रयत्न दिग्दर्शिका शेली चोपडानं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून केला आहे. या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. साहिल मिर्झा (राजकुमार राव) नावाचा एक लेखक-दिग्दर्शक आहे. जो आपल्या करिअरच्या मागे लागला आहे. त्याचवेळी चित्रपटात एक पंजाबी कुटुंब दाखवलं आहे. यातील स्वीटी (सोनम कपूर) ही बालपणापासूनच आपल्या लग्नाची स्वप्नं रंगवत असते. स्वीटीच्या वडिलांची म्हणजेच बलबीर चौधरी ही भूमिका अभिनेता अनिल कपूरने साकारली आहे. 

स्वीटीच्या डोक्यात असलेलं लग्नाबाबतचं खूळ पाहून तिचा भाऊ एक दिवस तिचं लग्न लावून देण्याचा विचार वडीलांकडे मांडतो. बलबीर चौधरीला हा विचार पटतो. त्यानंतर स्वीटीच्या लग्नासाठी मुलं शोधण्याची बलबीर आणि त्यांच्या मुलाची धावपळ सुरू होते. त्याचवेळी स्वीटीच्या मनात नेमकं काय सुरू हे कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. याच दरम्यान स्वीटी आणि साहिल मिर्झा यांची भेट होते. पहिल्याच भेटीत साहिलला स्वीटी भावते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. बलबीर आणि त्याच्या कुटुंबाला एक दिवस साहिलच्या स्वीटीवरील प्रेमाची गोष्ट कळते. त्यानंतर आपल्या लेकीचं लग्न साहिलशी लावून द्यायला बलबीर तयार होतो. मात्र लग्नाची ही गोष्ट ऐकून स्वीटीला धक्का बसतो. तिच्या जीवनात जणू काही वादळच येतं. त्यावेळी एक सत्य जगापासून लपवण्याचा ती विचार करते. मात्र तिथेच चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट आहे.

स्वीटी जगापासून लपवू पाहणारी गोष्ट तिच्या भावाला कळते. आपल्या बहिणीचं प्रेम साहिलवर नसून कुण्या एका दुसऱ्या मुलीवर (रेजीना कसांड्रा) आहे हे वास्तव ऐकून त्याच्या पायाखालून जणू काही वाळूच सरकते. तो ही बाब आपले वडील आणि कुटुंबीयांना सांगतो. सत्य ऐकल्यानंतर लेकीवर जीवापाड प्रेम करणारा बाप काय करतो?, साहिलच्या प्रेमकथेचं काय होतं?, स्वीटीच्या आयुष्यातील ती कोण आणि त्या दोघींच्या प्रेमकथेचं काय होतं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं  ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून मिळतील. 

चित्रपटाचा पूर्वांध लांबलचक आणि रटाळ वाटतो. मात्र उत्तरार्धात चित्रपटाची कथा वेग धरते आणि मनोरंजक वळणावर जाते. समलैंगिक किंवा लेस्बियन लव्हस्टोरीसारखा बोल्ड विषय चित्रपटातून हाताळणाऱ्या दिग्दर्शिका शेली चोपडा यांचं कौतुक व्हायला हवं. आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या कसोटीत त्या पास झाल्यात असं म्हटल्यास हा वावगं ठरू नये. कारण चित्रपट पाहिल्यानंतर प्रेमाच्या व्याख्येबाबत कथा नव्याने विचार करायला भाग पाडते. चित्रपटातील अनेक प्रसंग मनोरंजन करतात, हसवतात त्याचवेळी दुसऱ्या क्षणाला डोळ्यातून टचकन पाणीही आणतात. त्यामुळे शेली चोपडा यांचं दिग्दर्शन कमाल म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. सोनम कपूरने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या ताकदीने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. 

'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' यानंतर सोनमची ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातील स्वीटी भलतीच भाव खावून जाते. अनिल कपूर यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. विनोदी, प्रेमळ, भावुक पिता अशा विविध छटा त्यांनी उत्तमरित्या साकारल्या आहेत. पहिल्यांदाच लेकीसह त्यांनी स्क्रीन शेअर केला आहे. अनिल कपूर आणि सोनम कपूर यांची रिअल बापलेकीची जोडी रसिकांवर जादू करते. राजकुमार रावनं स्त्री चित्रपटातील भूमिकेनंतर आणखी एक जबरदस्त परफॉर्मन्स ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात दिला आहे. त्याने साकारलेला साहिल रसिकांना भावतो. 

रेजीना कसांड्रा ही दाक्षिणात्य अभिनेत्री पहिल्यांदाच हिंदीत काम करत आहे. तिने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. अभिनेत्री जुही चावलाही छोट्याशा भूमिकेतून रसिकांची मनं जिंकतात. अनिल कपूर आणि जुही यांचं बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावरील फ्लर्टिंग आणि कॉमेडी रसिकांना भावते.चित्रपटाचं संगीतही श्रवणीय आहे. मात्र चित्रपटाची ही कथा रसिकांच्या पचनी पडणार का हासुद्धा एक प्रश्न आहे. याआधी 'फायर' चित्रपटातून असा बोल्ड विषय मांडण्यात आला होता. त्यावरून मोठं वादळ उठलं होतं. अशात समलैंगिक किंवा लेस्बियन प्रेमकथा रसिक किंवा समाज कितपत स्वीकारेल हे पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वीच समलैंगिक संबंधांबाबत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाची कथा रसिक कितपत स्वीकारणार हे पाहणं रंजक ठरेल. 

टॅग्स :एक लडकी को देखा तो ऐसा लगासोनम कपूरअनिल कपूरराजकुमार राव