Join us  

शिवरायांचा छावा : संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा

By देवेंद्र जाधव | Published: February 16, 2024 1:04 PM

शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पट! कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा'?

Release Date: February 16, 2024Language: मराठी
Cast: भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, मृणाल कुलकर्णी, प्रसन्न केतकर, रवी काळे, अभिजित श्वेतचंद्र
Producer: Director: दिग्पाल लांजेकर
Genre:
लोकमत रेटिंग्स

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कहाण्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत. शिवरायांचा इतिहास आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सांगितला जातो. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यापासून अनेकांनी हा इतिहास चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवला. सध्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शिवराज अष्टक'च्या माध्यमातून शिवरायांची गाथा अनोख्या पद्धतीने सर्वांना सांगितली. याच दिग्पाल लांजेकर यांनी आता शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पट 'शिवरायांचा छावा' माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला आहे. या सिनेमा शिवराज अष्टकचा भाग नसला तरीही एक कौतुकास्पद प्रयत्न म्हणून या सिनेमाकडे बघता येईल. 

'शिवरायांचा छावा' सिनेमाची कथा सुरू होते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून. शिवराय निवर्तल्यानंतर स्वराज्याची रयत काहीसा पोरकेपणा अनुभवत असते. या रयतेला आधार देण्यासाठी आणि स्वराज्याचा कारभार सांभाळण्यासाठी संभाजी महाराज राज्याकारभाराची सूत्र हाती घेतात. रायगडावर शंभूराजांचा थाटामाटात राज्याभिषेक सोहळा पार पडतो. 

शिवाजी महाराजांनंतर दख्खन आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत औरंगजेब दबा धरून बसलेला असतो. तिकडे बुऱ्हाणपूरात काकर खान गोरगरीब रयतेकडून जोरजबरदस्तीने करवसुली करण्यासाठी आक्रमक होतो. नुकतेच स्वराज्याचे छत्रपती झालेल्या संभाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांचा राग अनावर होतो. मग शंभूराजे एक मोहीम हाती घेतात. ही मोहीम कोणती? आणि स्वराज्यावर डोळा ठेवून असलेल्या गनीमांचा सामना ते कसा करतात? याची कहाणी 'शिवरायांचा छावा' सिनेमातून कळते. 

'शिवरायांचा छावा' सिनेमात वेळोवेळी संभाजी महाराजांच्या आठवणीतून शिवाजी महाराज यांनी त्यांना दिलेल्या शिकवणीचा उलगडा होतो. सिनेमा अनेकदा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन शिव-शंभू या पिता-पुत्राचं नातं आपल्याला दाखवतो. क्वचित समयी दोघांनाही स्वराज्याची शिकवण देणाऱ्या जिजाऊ मांसाहेब सुध्दा दिसतात. 

'शिवरायांचा छावा' सिनेमाची एक विशेष गोष्ट सांगता येईल ती म्हणजे... आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावर जे सिनेमे आले किंवा नाटकं आली, त्या सर्व कलाकृतींमध्ये संभाजी महाराजांभोवती चालणारं राजकारण, त्यांच्यावर झालेला अन्याय, शिवाजी महाराज-संभाजी महाराज यांच्यात झालेले मतभेद अशा गोष्टी दाखवण्यात आल्या. 'शिवरायांचा छावा' सिनेमात मात्र या गोष्टी टाळण्यात आल्या आहेत. संपूर्ण सिनेमा शंभूराजांच्या धाडसी व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो. 

दिग्पाल लांजेकर यांनी नेहमीच्या शैलीत 'शिवरायांचा छावा' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न केला गेलाय. याशिवाय सिनेमातील मावळे अन् सरदारांची पुन्हा एकदा लांजेकरांनी वेगळ्या शैलीत ओळख करून दिली आहे. सिनेमातली गाणी, संगीत लढाईच्या प्रसंगी अंगावर रोमांच उभे करतात. मध्यंत्यराआधी सिनेमा खूप लांबला आहे असं वाटतं. त्यामुळे थोडी लांबी कमी केली असती तर 'शिवरायांचा छावा' आणखी परिणामकारक झाला असता यात शंका नाही. 

अभिनयाबाबतीत सर्वच कलाकारांनी चांगली कामं केलीत. संभाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण पाटीलने शानदार अभिनय केला. शंभूराजांचा रुबाब, अन्यायाविरुद्ध येणारा राग, गनीमांविरुद्ध डोळ्यात धुमसणारी आग भुषणने चांगली साकारली आहे. संभाजी महाराजांची देहबोली त्याने आत्मसात करायचा प्रयत्न केलाय. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर लक्षात राहतात. तृप्ती तोरडमल, मृणाल कुलकर्णी, प्रसन्न केतकर, रवी काळे अशा कलाकारांनीही त्यांना दिलेल्या भूमिकांमध्ये सार्थ अभिनय केलाय. ज्योत्याजीची भूमिका साकारणारा अभिजित श्वेतचंद्र विशेष लक्षात राहतो. 

दिग्पाल लांजेकार यांचे शिवराज अष्टक मधील सिनेमे ज्यांना आवडले असतील आणि ज्यांना ऐतिहासिक सिनेमे पाहण्याची आवड आहे त्यांच्यासाठी 'शिवरायांचा छावा' पर्वणी आहे. "शौर्यगाथा पुढे सुरू राहील..", अशी पाटी सिनेमा संपल्यावर झळकते. त्यामुळेच शिवराज अष्टक प्रमाणेच दिग्पाल लांजेकर शंभूराजेंच्या पराक्रमावर आधारित चित्रपट सिरीज काढणार, यात शंका नाही. तर एकूणच 'शिवरायांचा छावा' सिनेमाचा थिएटरमध्ये एकदा नक्कीच अनुभव घेऊ शकता.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट