Join us  

Baba Movie Review: भावनेला खरंच भाषा नसते

By अजय परचुरे | Published: August 01, 2019 1:01 PM

बाबा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ठळक मुद्देराज आर गुप्ता हा तसा नवीन दिग्दर्शक पण त्याने बाबामध्ये उभारलेलं भावविश्व प्रयत्नपूर्वक आहे.बाबा हा एकदा अनुभवण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे. 
Release Date: August 02, 2019Language: मराठी
Cast: दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर
Producer: मान्यता दत्त, अशोक सुभेदारDirector: राज आर गुप्ता
Duration: 2 तास 12 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

मराठीत सध्या अत्यंत उत्तम संहिता असलेले सिनेमे येत आहेत. नवीन दिग्दर्शक आपल्याला गवसलेली कथा उत्तम पध्दतीने मांडण्याचा पुरेपर प्रयत्न करतायत ही नक्कीच आनंदाची बाब आहे. बाबा हा सुध्दा त्याच प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. सिनेमाची कथा उत्तमच आहे त्याचबरोबर यात प्रत्येक कलाकारांनी केलेला अभिनय तितकाच प्रभावी आहे. राज आर गुप्ता हा तसा नवीन दिग्दर्शक पण त्याने बाबामध्ये उभारलेलं भावविश्व प्रयत्नपूर्वक आहे. प्रभावी उभारलं आहे असं न म्हणण्या मागचं कारण बाबाची संहिता जरी उत्तम असली तरी मांडणीत थोडे उन्नीस बीस नक्कीच झाले आहेत. आणि याच कारणाने बाबा एक उत्तम सिनेमा नक्कीच होत नाही. मात्र बाबा हा एकदा अनुभवण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे.  

बाबा ही एका छोट्याश्या गावातील आपल्याच विश्वात राहणाऱ्या कुटुंबाची कथा आहे. माधव(दीपक दोब्रीयाल), आनंदी (नंदिता पाटकर) आणि शंकर( आर्यन मेघजी)  हे तिघांचे सुखी-आनंदी असे कुटुंब आहे. ते एका दुर्गम अशा टेकडीवर राहत असतात. हे कुटुंब एकत्र हसते, एकत्र रडते आणि एकत्र आयुष्य कंठत असते. कोणतीही समस्या आली तरी त्यांच्यात बदल होत नाही. जर प्रकाश कसा निर्माण करायचा हे माहित असेल तर अगदी अंधारलेल्या काळातही आनंद शोधता येतो, या उक्तीवर या कुटुंबाचा ठाम विश्वास आहे. माधव आणि आनंदी हे दोघंही मूकबधिर आहेत. शंकर मूकबधिर नसला तरी माधव आणि आनंदीने त्याला जगापासून अलिप्त ठेवल्याने त्याचा खरा आवाज त्यालाच सापडला नाहीये किंवा तो त्याला माहितीच नाही. अशातच एक दिवस शंकरची खरी आई पल्लवी (स्पृहा जोशी) त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभी राहते आणि शंकरला आपल्याकडे परत द्या अशी मागणी करते. मुळात ८ वर्षापूर्वी पल्लवीच्या पोटी शंकरचा जन्म झालेला असतो. मात्र पल्लवीच्या या बाळाचा तिचे वडील स्वीकार करत नाहीत. आणि ते बाळ माधव आणि आनंदीकडे सोपवण्यात येते. ८ वर्षानंतर पल्लवीचं राजनसोबत (अभिजित खांडकेकर) लग्न होतं. आणि वडीलांच्या निधनानंतर ती आपलं बाळ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी माधव आणि आनंदीकडे राजनसोबत येते. मात्र माधव आणि आनंदी याला विरोध करतात. प्रकरण स्थानिक कोर्टापर्यंत जातं. मग पल्लवीला तिचा शंकर पुन्हा मिळतो का ? माधव आणि आनंदीच्या बाजूने निकाल लागतो का ? शंकरला त्याचा आवाज गवसतो का ? ह्याची उत्तरं तुम्हांला सिनेमा पाहिल्यावर मिळतील.  

बाबाची संहिता उत्तम आहे. राज आर गुप्ता या तरूण दिग्दर्शकाने कलाकारांची केलेली निवडही उत्तम आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सिनेमात जी लोकेशन निवडली आहेत ती ही निसर्गरम्य आणि सुंदर आहेत. मात्र हा सिनेमा उत्तम होऊ शकला असता. माधव आणि आनंदी या मूकबधिर दांमपत्याने शंकरला वाढवलं त्याचा उत्तम सांभाळ केला. मात्र शंकरला बोलता येत नाही त्याचा जगाचा संपर्क फारसा नाही या गोष्टी जरा खटकतात. कारण सिनेमात शंकर गावात जातो. जत्रेत जातो. त्याचा लोकांशी संपर्क येतो. मग तो बोलू शकत नाही ह्या गोष्टी थोड्या खटकतात ह्याचा थोडा खोलात जाऊन विचार होणं गरजेचं होतं. तेवढी एक गोष्ट खटकली तरी सिनेमातील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय केला आहे.  दीपक दोब्रियाल या अभिनेत्याने बाबा या सिनेमाने मराठीत पदार्पण केलं आहे. मूकबधीर असलेला माधव त्याने फर्मास रंगवलाय. आपल्या कुटुंबासाठी राबणारा, मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि कायदेशीर लढाई लढताना जे काही करता येईल त्याची पूर्तता करणारा बाप त्याने एकही वाक्य नसूनसुध्दा अप्रतिम रंगवला आहे. दीपकला नंदीता पाटकरची तितकीच उत्तम साथ लाभली आहे. आपल्या मुलासाठी लढणारी , त्यासाठी वाट्टेल करायला धजावणारी आनंदी नंदीताने उत्तम साकारली आहे. शंकरच्या मित्राच्या भूमिकेत चित्तरंजन गिरींनीही उत्तम कामगिरी केली आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या मित्राला पदोपदी मदत करण्यासाठी सरसावणाऱ्या त्र्यंबकची भूमिका गिरींनी योग्यरित्या निभावली आहे.  पल्लवी आणि राजन या दांमपत्याच्या भूमिकेला स्पृहा जोशी आणि अभिजित खांडकेकर या जोडीने योग्य न्याय दिला आहे. स्पृहा आणि अभिजितचा लूकही या सिनेमात फर्मास जमला आहे. जयवंत वाडकर,शैलेश दातार यांनीही उत्तम साथ दिली आहे. या सिनेमाचा क्रेंद्रबिंदू म्हणजे बालकलाकार आर्यन मेघजीने शंकरची भूमिका त्याने सहजरित्या साकारली आहे. लहान वयात त्याची भूमिका समजण्याची समज खरंच वाखाण्याजोगी आहे. संहिता उत्तम असलेल्या आणि कलाकारांच्या भूमिकांसाठी बाबा हा एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.  

 

 

टॅग्स :बाबा चित्रपटसंजय दत्तस्पृहा जोशीअभिजीत खांडकेकर