ऑनलाइन लोकमत
स्टार :2/5
स्टार कास्ट :विन डिझेल, दीपिका पादुकोण, डॉनी येन, रूबी रोज, नीना डोबरेव
दिग्दर्शक : डी जे कारुसो
प्रकार : अॅक्शन ड्रामा
मुंबई, दि. 14 - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉलिवूडपट 'ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज' सिनेमा अखेर बॉक्सऑफिसवर झळकला आहे.2002 मध्ये आलेल्या ‘ट्रिपल एक्स’ या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. 2005 मध्ये ‘ट्रिपल एक्सः स्टेट ऑफ दि युनियन’ हा सिनेमा आला होता. या सिनेमाचे मुख्य आर्कषण होते ते म्हणजे बॉलिवूडची मोहिनी दीपिका पादुकोण. दीपिकाने 'ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये दमदार पर्दापण केले आहे. या सिनेमामध्ये विन डिझेल मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाची कहाणी एका 'पॅन्डोरा बॉक्स' शोधमोहीमेच्या अवतीभोवती फिरणारी आहे. पॅन्डोरा बॉक्स हे असे एक उपकरण आहे, ज्याच्या माध्यमातून जगभरातील सॅटलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात. काही चोर हा पॅन्डोरा बॉक्स पळवून नेतात, तो शोधण्यासाठी सरकार जेंडर केज (विन डिझेल)कडे शोधमोहीम सोपवते.
जेंडर या मोहीमेत सेरिना (दीपिका पादुकोण), निक्स (क्रिस वू), एडिल वुल्फ (रूबी रोज), बेकी (नीना डॉबरेव), टेलन (टोनी जा) सारख्या अष्टपैलू व्यक्तींना आपल्या टीममध्ये सहभागी करतो. हे मिशन अगदी योग्य पद्धतीने सुरू असताना अशी माहिती समोर येते की तेथील सरकार या एजंट्सना संपवण्याच्या कट रचत आहेत. यामुळे कहाणीमध्ये ट्विस्ट येतो आणि उत्कृष्ट पद्धतीने अॅक्शनपॅक्ड कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळते.
सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स उत्तमरित्या शूट करण्यात आले असून दिग्दर्शनही चांगले आहे. सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्सदेखील उत्कृष्ट आहेत. मात्र काही ठिकाणी सिनेमाची कहाणी अगदीच रटाळ वाटू शकते. दरम्यान, सिनेमातील सर्व कलाकारांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने निभावली आहे. सिनेमातील दीपिका पादुकोणची भूमिकाही उल्लेखनीय आहे. तिचे अॅक्शन सीन्स लाजवाब आहेत.
सिनेमातील स्टार कास्टचे जर तुम्ही चाहते असाल आणि विशेष करुन दीपिका पादुकोण-विन डिझेल तुम्हाला खूप आवडत असतील, तर हा अॅक्शनपट नक्कीच पाहा. पण जर तुम्ही हॉलिवूड सिनेमांचे फॅन असला तर हा सिनेमा तुमचं मन जिंकण्यात जरा कमी पडू शकतो.