Join us  

मनमानसीच्या गाथेचे सांगीतिक चित्रकाव्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 3:16 AM

आवली वेदनेने कळवळते आणि रंगमंचाच्या अवकाशात एक चित्रकाव्य आकार घेऊ लागते.

राज चिंचणकर|नाटक : संगीत देवबाभळीतुकोबारायांना शोधत आवलीचे डोंगर चढणे सुरू आहे. अवो.. अवो.. अशी साद घालत त्यांना हुडकत असतानाच तिच्या पायात काटा रूततो. हा काटा साधासुधा नाही; तर साक्षात देवबाभळीचा हा काटा आहे. आवली वेदनेने कळवळते आणि रंगमंचाच्या अवकाशात एक चित्रकाव्य आकार घेऊ लागते. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने हा रचनात्मक आकृतिबंध रंगभूमीवर रेखाटला असून, नि:शब्द करणारा असा सात्त्विक कोलाज मंचित केला आहे. मनमानसीच्या या विठूसावळ्या सांगीतिक गाथेने थेट इंद्रायणी काठी नेत, माउली ती भेटली भेटलीचा साक्षात्कार घडवला आहे.तुकोबांनी इंद्रायणीत गाथा बुडवल्यावरही त्या तरंगल्या; तसेच या नाटकातल्या आवली व लखुबाई यांच्या मनातल्या व्यथांचेही काहीसे असावे; यावर हे नाट्य प्रवाहीपणे तरंग उमटवते. या व्यथांच्या माध्यमातून देवत्व आणि मनुष्यत्व यांची उत्कट सांगड घालताना हे नाटक त्यांच्यातली साम्यस्थळेही प्रकर्षाने दाखवून देते. हे सर्व मांडताना, स्त्रीजन्माच्या कहाणीचे यथार्थ दर्शन हे नाटक टोकदार पद्धतीने घडवते.लेखक व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याने या नाटकात तुकोबारायांची गर्भवती असलेली अर्धांगिनी आवली आणि साक्षात विठ्ठलाच्या सांगण्यावरून पृथ्वीतलावर लखुबाईचे रूप घेऊन आलेली रखुमाई, या दोन स्त्री पात्रांना एकत्र आणण्याच्या संकल्पनेची केलेली रु जवात भन्नाट आहे. हे करताना आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले, अशीच स्थिती बहुधा लेखकाची झाली असावी. लेखक म्हणून ही संकल्पना सुचणे जितके महत्त्वाचे; तितकेच दिग्दर्शक या नात्याने ती मंचित करणे आव्हानात्मक! अवघ्या दोन पात्रांच्या माध्यमातून रंगमंचाचा अवकाश त्याने केवळ भरून टाकलेला नाही; तर तो थेट भारून टाकण्याची कामगिरी केली आहे.गद्य अणि पद्याची बेमालूम सांगड घालत, या दोन स्त्रियांच्या मनातल्या भावना त्याने मोठ्या नजाकतीने पेश केल्या आहेत. अनेकदा तर या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही गरज पडत नाही, यातच सर्वकाही आले. या दोन पात्रांच्या मनातला गर्भित अर्थ शब्दांविना अंत:करणापर्यंत पोहोचतो आणि यातच लेखक-दिग्दर्शकाचे यश आहे. इंद्रायणीच्या घाटावर लुगडे धुणारी लखुबाई असो किंवा वाऱ्याच्या स्पर्शाने तुकोबांच्या वह्यांमधील कागदांचे फडफडणे असो; अवो.. अशी साद घालणारी आवली असो किंवा शेल्याची चिंधी घेऊन जाणारी लखुबाई असो; अशा प्रकारच्या अनेकविध रूपकांची केलेली पेरणी या नाट्याला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवते.कलावंतांच्या ठायी असलेला आत्मविश्वास ही काय चीज आहे; हे या प्रयोगात ठोस दृश्यमान होत जाते. या नाटकात आवली साकारणारी शुभांगी सदावर्ते हिचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे, हे जाणवून देणारी पुसटशी खूणही या भूमिकेत सापडत नाही. संवाद आणि स्वर यांचा अनोखा मिलाफ तिच्यात अंगभूतच असावा; याचे प्रसन्न प्रतिबिंब तिच्या या आवलीमध्ये पडले आहे. अभिनयाचे गायकीयुक्त यथार्थ दर्शन घडवणाºया शुभांगीच्या ओंजळीत, अगदी पदार्पणातच आलेल्या या भूमिकेने तिच्याविषयीच्या अपेक्षा प्रचंड वाढवल्या आहेत. तीच गोष्ट लखुबाई रंगवणाºया मानसी जोशी हिची आहे. उत्तम संवादफेक आणि देहबोलीचा अचूक उपयोग करून घेत तिने या भूमिकेत उत्कट रंग भरले आहेत. लाल मळवट भरलेल्या तिच्या ललाटी या भूमिकेचे भाग्य आधीच लिहिले होते, असेच सतत वाटत राहते.तांत्रिक बाजूंची भक्कम साथ या नाटकाला आहे. तुकोबांचे मातीचे घर, त्यातली चूल, जुनाट भांडी आदी साहित्य; तर दुसरीकडे इंद्रायणीचा घाट, पायºया वगैरे स्थळे नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी ताकदीने निर्माण केली आहेत. दिग्दर्शकाने त्याचा केलेला उपयोग मन मोहून टाकणारा आहे. लय, सूर, ताल यांचा अद्भुत संयोग आनंद ओक यांच्या संगीतात झालेला दिसतो. अवीट गोडीने तुकोबांचे अभंग त्यांनी सुविहितपणे हृदयापर्यंत पोहोचविले आहेत. प्रफुल्ल दीक्षित यांच्या प्रकाशयोजनेचा खेळ अफलातून आहे. महेश शेरला यांची वेशभूषा चपखल; तर सचिन वारिक यांची रंगभूषा नजर खिळवून ठेवणारी आहे. ही सगळी जमवून आणलेली बैठक, थेट तुकोबांच्या काळात घेऊन जाणारी आहे.देवबाभळीचा काटा आवलीच्या पायात रु ततो; पण त्याची वेदना मात्र, त्याची अनुभूती घेणाºयाच्या अंत:करणाला झाल्याशिवाय राहणार नाही, याचा उत्कट अनुभव हे नाटक देते. नाट्यकृतींची रूढ चौकट मोडत भद्रकाली प्रॉडक्शनने हे नाटक रंगभूमीवर आणून, बरेच काही या हृदयीचे त्या हृदयी पोहोचिवण्याचे केलेले कार्य प्रशंसनीय म्हणावे लागेल.

टॅग्स :मराठी