Join us  

चित्रपटांच्या बिझनेसचा खरा आकडा समाजासमोर यावा

By admin | Published: September 25, 2015 3:17 AM

मागील वर्षी विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विनय आपटे, सविता मालपेकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे असे दिग्गज कलाकार असलेला आणि गजेंद्र अहिरे

मागील वर्षी विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विनय आपटे, सविता मालपेकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे असे दिग्गज कलाकार असलेला आणि गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला स्वामी पब्लिक लिमिटेड चित्रपट तर लवकरच अजय-अतुल या बड्या दिग्गज संगीतकारांसोबत तुमच्या-आमच्या भेटीला येत असलेला ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटांची चर्चा झाली आहे ती एका नावामुळे. ते नाव म्हणजे या चित्रपटांच्या निर्मात्या पूनम शेंडे. सारथी एंटरटेनमेंटच्या पूनम शेंडे यांनी निर्मितीक्षेत्रातील आपले अनुभव आणि मराठी चित्रपटांमध्ये कशी सुधारणा झाली पाहिजे याबद्दल ‘लोकमत सीएनएक्स’शी चर्चा केली.चित्रपटाचे कथानक सुचण्यापासून ते जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची मोठी प्रोसेस असते. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार आणि त्यापलीकडे दिग्दर्शक इथवरच विचार केला जातो. मात्र तो चित्रपट तयार करण्यासाठी आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात ते निर्माते मंडळी. हिंदी असो वा मराठी चित्रपट, त्यामध्ये पहिला मुद्दा येतो ते बजेटचा. त्यामुळे निर्मात्यांशिवाय चित्रपटाचं पानही हलू शकत नाही असंच म्हणावं लागेल. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत ते त्याच्या विविध विषयांच्या हाताळणीमुळे आणि प्रयोगांमुळे. मात्र अजूनही असे काही चित्रपट आहेत जे येतात कधी आणि जातात कधी याचा पत्ताही लागत नाही. याबद्दल पूनम शेंडे सांगतात, आज अनेक फ्रेश आणि तरुण दिग्दर्शक या क्षेत्रात येत आहेत आणि नवनवीन प्रयोगही करू पाहत आहेत. प्रयोग करणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच चित्रपटाचा बिझनेस या गोष्टीचाही तितकाच विचार करायला पाहिजे. कारण केवळ विषय चांगला आहे म्हणजे चित्रपट चालेल असं नसतं, तर तो चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहणंही तितकचं महत्त्वाचं असतं. वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट बॉलिवूडकरांनाही मराठी चित्रपट इंडस्ट्रीत येण्याची भुरळ पाडत आहेत. ही एक आपली चांगली बाजू असली तरी मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी हिंदी चित्रपटांप्रमाणेच खरोखरच किती बिझनेस केला हे लोकांसमोर मांडले पाहिजे. कारण जे नवीन लोक निर्मिती क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांनी ऐकलेला आकडा आणि त्यांनी चित्रपट निर्मित केल्यानंतर स्वत:ला झालेला नफा किंवा तोटा यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. सध्या बोटावर मोजण्याइतकेच निर्माते असे आहेत जे बरीच वर्षे निर्मिती क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत, पण आता जे अमहाराष्ट्रीय निर्माते मराठी चित्रपटांमध्ये पैसे लावत आहेत. ते येतात आणि एकच चित्रपट करून गायब होतात. यासाठी नफा असो वा तोटा, चित्रपटाने केलेल्या बिझनेसची खरी फिगर समाजासमोर आली तर ते मराठी चित्रपट सृष्टीच्याच फायद्याचे आहे.पुण्या-मुंबईबाहेर चित्रपट पोहोचणे आवश्यकआज मराठी चित्रपट पुण्या-मुंबईपर्यंतच मर्यादित आहे; कारण मराठी इंडस्ट्रीच मुळात अनआॅर्गनाइजड् आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर डिस्ट्रिब्युटरकडे जाण्याऐवजी जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट रेडी असते; त्याच वेळी वितरकाला त्याची कल्पना देणे गरजेचे असते. कारण तरच त्याला कोणते थिएटर कधी मिळू शकते, पुण्या-मुंबईबाहेर चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी लागणारा वेळ, त्याची स्ट्रॅटेजी या सर्वांबाबत योग्य नियोजन करणे सोपे जाते. चित्रपटाची तारीख ६ महिने आधी डिक्लेअर केली पाहिजेएका आठवड्याला जवळपास तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. त्यात हिंदी चित्रपटही प्रदर्शित होत असतातच. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर किंवा थिएटर मालकांपुढे कोणत्या चित्रपटाला कोणता शो द्यायचा हा प्रश्न उभा राहणे साहजिकच आहे; आणि त्यामुळेच मराठी चित्रपटांना प्रत्येक वेळी प्राइम टाइम मिळणे अशक्य होत आहे. त्यासाठी चित्रपट प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी किमान सहा महिने आधीच डिक्लेअर केली पाहिजे.