Join us  

राजेश आणि ऋषिकेश ने साधला ‘गोटया’चा नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 9:37 AM

अभिनेता राजेश श्रुंगारपुरे आणि  नवोदित बालकलाकार ऋषिकेश वानखेडे या कलाकारांच्या साथीने ६ जुलैला हा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे. ‘गोटया’ हा खेळच या सिनेमाचा खरा हिरो आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षक म्हणून खेळाची आवड असणाऱ्या कसदार अभिनेत्याची असलेली आवश्यकता राजेशने पूर्ण केली.

आज विविध खेळांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमांची निर्मिती केली जात आहे, या सर्वांमध्ये ‘गोटया’ हा खेळही रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल. हीच संकल्पना सत्यात उतरवत निर्माते  जय केतनभाई सोमैया आणि दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे यांनी ‘गोटया’ या खेळाची कहाणी रुपेरी पडद्यावर सादर केली आहे. अभिनेता राजेश श्रुंगारपुरे आणि  नवोदित बालकलाकार ऋषिकेश वानखेडे या कलाकारांच्या साथीने ६ जुलैला हा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे. ‘गोटया’ हा खेळच या सिनेमाचा खरा हिरो आहे. हा खेळ खेळता येऊ शकेल असा मुलगा या सिनेमासाठी हवा होता. अखेर ऋषिकेशच्या रूपात ‘गोटया’ चा शोध संपला. प्रशिक्षक म्हणून खेळाची आवड असणाऱ्या कसदार अभिनेत्याची असलेली आवश्यकता राजेशने पूर्ण केली.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना ऋषिकेश सांगतो की, या सिनेमासाठी भगवानसरांना गोट्या खेळता येणाऱ्या मुलाची आवश्यकता होती. मला गोट्या खेळायला खूप आवडतं. गोट्यांमधील विविध डाव मला ठाऊक आहेत. याचा उपयोग चंदेरी दुनियेत दाखल होण्यासाठी झाला आणि मी ‘गोटया’ या सिनेमाचा नायक बनलो. भगवानसरांनी अभिनयासोबतच ‘गोटया’ खेळण्याची वेगवेगळी शैलीही शिकवली. त्याचा चित्रीकरण करताना खूप फायदा झाला.

गोटयाला, गोटया खेळायला शिकवण्याची कामगिरी राजेशने साकारलेल्या प्रशिक्षकाकडे आहे. तसं पाहिलं तर राजेशने यापूर्वीही प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. याबाबत राजेश म्हणाला की, यापूर्वी ‘मन्या - द वंडर बॅाय’ या सिनेमात अॅथलिट, तर एकता- द पॅावर’ कबड्डी कोच बनलो होतो, पण ‘गोटया’ मधील प्रशिक्षक या दोन्ही सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. यासाठी माझाही नेम असणं गरजेचं होतं त्यामुळे मी ही प्रॅक्टिेस करायचो आणि आजही कधी कधी माझे चांगले नेम लागतात. आपल्याकडे ‘गोटया’ या खेळाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहिलं जातं. हे चुकीचं आहे. खरं तर हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो हे फार कमी लोकांना माहित असेल. या खेळामुळे शारीरीक हालचाली सुधारतातच, पण एकाग्रताही वाढते. हा बुद्धीचाही खेळ आहे. बालपणी मीदेखील गोटया खेळायचो. त्यामुळे या खेळाशी फार जवळच नातं आहे. या सिनेमामुळे पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एका सुंदर संकल्पनेवर तितकाच सुरेख सिनेमा तयार केल्याने एका चांगल्या सिनेमात काम केल्याचं समाधान लाभलं.

केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे या दोघांसोबत सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला,शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

 

टॅग्स :राजेश श्रृंगारपुरे