सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांची तुलना होऊ शकते... नक्कीच दोघीही तितक्याच ग्लॅमरस. २०१५च्या मध्यापर्यंत दोघींमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. मात्र, ‘टाइमपास २’नंतर प्रिया बापट काहीशी मागे पडली. सईने मात्र, ‘क्लासमेट’, ‘तू ही रे’, हिंदीतील ‘हंटर’ अशी घोडदौड सुरूच ठेवली होती. दरम्यानच्या काळात ‘डबल सीट’वरून आलेली मुक्ता बर्वे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ दुसऱ्यांदा करीत मराठी चित्रपटसृष्टी व्यापून गेली. ‘मितवा’ म्हणत आलेल्या सोनालीने ‘शटर’मध्ये वेगळ्या शैलीच्या अभिनयाने लक्ष वेधून घेतले. ही जंत्री देण्याचे कारण म्हणजे, सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ या चित्रपटात सई ताम्हणकर आणि प्रिया बापट एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. सई तशी दिग्दर्शक संजय जाधव यांच्या कॅम्पमधील. मात्र, ‘गुरू’ चित्रपटामध्ये अंकुश चौधरीबरोबर ‘दगडी चाळ’मधील कलरफुल पूजा सावंतला संधी मिळाली. त्यामुळे सई सचिन कुंडलकरच्या कॅम्पमध्ये जॉइन झाली. प्रियाने सचिनच्याच ‘हॅपी जर्नी’मध्ये अभिनय करून उत्कृष्ट अभिनेत्रीचा किताबही पटकावला आहे. दोघींनाही एका हिटची आवश्यकता आहे. ‘क्लासमेट’नंतर सईला म्हणावे असे यश मिळालेले नाही. सई आणि प्रिया या दोघीही कष्टाळू अभिनेत्री मानल्या जातात. या चित्रपटासाठी प्रियाने आपले वजन वाढविले होते. त्यामुळे या दोघींचा सामना पाहण्याची उत्सुकता आहेच.
प्रिया-सई आमनेसामने
By admin | Updated: February 15, 2016 03:17 IST