सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी, ऐश्वर्या राय, मेरी कोम, सलमान खान, स्मृती इराणी, अक्षयकुमार ही नावं आपल्यासाठी नवीन नाहीत, पण तुम्हाला हे ठाऊक आहे का? यातील बहुतेक मंडळी ही शाळा-कॉलेजातून अपेक्षित असे यश मिळवू शकलेली नव्हती. एवढेच काय, या अवलियांपैकी अनेकांच्या यशाची सुरुवात शाळेत वा कॉलेजमध्ये मिळालेल्या ३५% सोबतच झाली होती. तेच ‘पस्तीस टक्के’ ज्यांनी या लोकांना त्यांना जे आवडतं ते करण्याची संधी दिली. एका अशाच पस्तीस टक्क्यांचा मानकरी असलेल्या मुलाची गोष्ट आपल्या भेटीला येतेय आगामी ‘३५% काठावर पास’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. कॉलेजमध्ये ३५% मिळवणारा हा ‘गुणवंत विद्यार्थी’ मिळणाऱ्या मार्कांच्या पलीकडे जाऊन काय धमाल करतो, तसेच निकालात मिळणाऱ्या टक्क्यांच्या पलीकडल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीवर आपले लक्ष वेधून घेताना त्याच्या आयुष्यात येणारे यू-टर्न, प्रेम..परीक्षा.. आणि त्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम्स यांची मोट लेखकाने अगदी मजबूतरीत्या या चित्रपटात बांधलेली आहे. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका ‘दगडू’ म्हणजेच प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. ‘बालक-पालक’ या रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटात आपण पाहिलेला ‘विशू’ आणि त्यानंतर आलेल्या ‘टाइमपास’ व ‘टाइमपास २’मधील ‘दगडू शांताराम परब’ या दोन्ही गाजलेल्या भूमिका साकारताना दिसलेला प्रथमेश येत्या ‘३५% काठावर पास’मध्ये एका नव्या धाटणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सेजल शिंदे फिल्म्स आणि ५२ फ्रायडे सिनेमाज हे सादरकर्ते असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सतीश मोतलिंग यांचे आहे. प्रियतमा या मराठी चित्रपटानंतर मोतलिंग या नव्या जॉनरचा विषय हाताळताना दिसतील. ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास २’ च्या घवघवीत यशानंतर, प्रथमेश ‘३५ टक्क्यांच्या’ निमित्ताने पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करण्यास सज्ज झाला आहे.
प्रथमेश परब झाला ३५% पास
By admin | Updated: March 11, 2016 02:04 IST