Join us  

प्रथमेश केळकरचं 'डोळस'द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 4:51 PM

अभिनयाकडे वळलेल्या प्रथमेशचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

प्रत्येक कलाकार मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहण्याच्या उद्देशानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असतो. अभिनयाला मेहनतीची जोड देतात तेच मनोरंजन विश्वात यशस्वी होतात आणि शिखरावर पोहोचतात. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुढची पिढीही अभिनयात करियर करण्याचं स्वप्न पहात वाटचाल सुरू करते. अभिनयात करियर घडवण्याच्या उद्देशानं कठोर परिश्रम करणारा उदयोन्मुख अभिनेता प्रथमेश अशोक केळकर लवकरच एका शॅार्ट फिल्ममध्ये झळकणार आहे. अभिनयाकडे वळलेल्या प्रथमेशचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

प्रथमेशकडे सध्या एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क तीन शॅार्ट फिल्म्सच्या ऑफर्स आहेत. या तिनही शॅार्ट फिल्म्सचे विषय अतिशय भिन्न असून, त्यातील प्रथमेशच्या व्यक्तिरेखाही त्याच्या अभिनयाचे विविध पैलू सादर करणाऱ्या तसंच त्याच्या अभिनयाचा कस लावणाऱ्या आहेत.  यातील फायरफ्लाय या बॅनरखाली शॉर्ट फिल्मची निर्मिती होत असलेली 'डोळस' हि शॅार्ट फिल्म नेत्रदानाचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे. 

'डोळस' नेत्रदान करण्यासाठी करेल प्रोत्साहितआजवर बऱ्याच आघाडीच्या कलाकारांनी नेत्रदानाचं महत्त्व सांगण्याचं काम केलं आहे. ही शॅार्ट फिल्मही तेच कार्य करत समाजात जागरुकता पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. याचं लेखन एका एकांकिकेवरून करण्यात आलं आहे. २०१० मध्ये रंगभूमीवर आलेल्या 'डोळस' या एकांकिकेचं दिग्दर्शन निलेश पाटील यांनी केलं होतं. शॅार्ट फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा श्वेता बसनाक यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. ही शॅार्ट फिल्म प्रेक्षकांना नेत्रदान करण्यााठी प्रोत्साहित करणारी आहे. याचं शूटिंग मुंबईतच करण्यात आलं आहे. याखेरीज प्रथमेशकडे 'गोलगप्पा' आणि 'माईंड' या दोन शॅार्ट फिल्म्स आहेत. या दोन्ही शॅार्ट फिल्म्समध्ये प्रथमेशची भिन्न रूपं पहायला मिळणार आहेत. दोन्ही लघुपटांचे विषयही महत्त्वाचे संदेश समाजापर्यंत पोहोचवणारे आहेत.

वडीलांकडूनच प्रथमेशला लाभलाय कलेचा वारसा

प्रथमेशबाबत सांगायचं तर तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला आहे. दादर येथील डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूलमध्ये प्रथमेशनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर सध्या तो वेलणकर कॅालेजमध्ये मार्केटींग मॅनेजमेंटमध्ये पहिल्या वर्षाला शिकतोय. ब्लू नाइन अकॅडमीमध्येही त्यानं प्रशिक्षण घेतलं आहे. प्रथमेशचे वडील अशोक केळकर यांना फिल्म इंडस्ट्रीची अतिशय आवड आहे. या आवडीपोटीच त्यांनी 'मंगळसूत्र' शीर्षक असलेल्या एका लघुपटाची निर्मितीही केली होती. या लघुपटात त्यांनी अभिनयही केला होता. वडीलांकडूनच प्रथमेशला कलेचा वारसा लाभला आहे. भविष्यात आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत लवकरच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याची प्रथमेशची इच्छा आहे.