प्रयोगशीलतेच्या दृष्टीने मराठी सिनेमा हिंदीच्याही खूप पुढे गेला आहे. वेगवेगळे अन् धाडसी विषय हाताळून मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी छाप उमटविली आहे. मराठीत तयार होणारे चित्रपट एवढे चांगले आहेत, की त्यांची तुलना प्रादेशिक भाषेतील चित्रपटांशी होऊ शकत नाही. एखाद्या निर्मात्याने किंवा दिग्दर्शकाने मराठीतील चित्रपटाला हिंदीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला, तरी तो त्याचा दर्जा सांभाळूच शकणार नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री अमिता खोपकरने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केले. च् तुम्ही आता हिंदी मालिकांमध्ये काम करीत आहात, तेथेही तुमची फार प्रसंशा होत आहे? ल्ल मला मराठीमध्येच काम करायला आवडते. हिंदी मालिकांमध्ये मी काही वर्षांपासून काम करीत असले तरी इकडे माझी एंट्री बायचान्स झाली. तेथील वातावरण मराठीसारखेच आहे; पण थोड प्रोफेशनल आहे. मात्र तरीही आम्ही कुटुंबासारखेच झालो आहोत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत शूटिंगचे शेड्यूल असते. सिरिअल्स म्हणजे आमची एक प्रकारे नोकरीच झाली म्हणा ना!टीव्ही के उस पार या हिंदी मालिकेत तुम्ही काम करीत आहात. ही भूमिका कशी आहे? या मालिकेत मी मधू नावाच्या एका सामान्य बाईच्याच भूमिकेत दिसणार आहे. मधू घरी राहणारी, घर सांभाळणारी असली तरी तिला टीव्हीचे प्रचंड वेड आहे. ती टीव्हीच्या आभासी जगात रमणारी आहे. ती पाहत असलेल्या मालिकांमध्ये ती जगते. टीव्ही हेच जग आहे, असे तिला वाटते. आपल्याकडे सिनिअर सिटीझन बायकांना असेच वेड असते. याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. एका मालिकेत काम करताना काही लोकांना त्या मालिकेशी संबंधित प्रश्न विचारले होते. यावरून तुम्हाला बायकांचे टीव्हीवर असलेले प्रेम कळू शकते. मी साकारत असलेल्या मधूकडे काही सुपर पॉवर्स आहेत. आताचा टीव्ही पूर्वीच्या तुलनेत प्रगल्भ झाल्यासारखा वाटतो? नाही, सध्या तरी नाही. टीव्ही मला पूर्वीपासूनच काळाच्या मागे नेणारा वाटतो. त्यात अजूनही ती प्रगल्भता आलेली नाही. मात्र, ज्या लोकांना केवळ मनोरंजन हवे आहे अशांसाठी हे माध्यम ठीक आहे. नाटक, चित्रपटांच्या तुलनेत टीव्ही प्रगल्भ व्हावा, ही आता काळाची गरज झाली आहे. प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांचे हिंदीत रूपांतर होत आहे. मराठीचेही तसे व्हावे, असे तुम्हाला वाटते का? मराठी चित्रपटाचा दर्जा हा खूप चांगला आहे. दर्जेदार चित्रपटनिर्मिती हेच मराठीचे वैशिष्ट्य आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा हिंदीत रूपांतरित होताना सांभाळला जाण्याची शक्यता कमीच आहे. मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपट तयार करताना तांत्रिकदृष्ट्या तो चांगला असेलही; पण त्याचा आत्मा तो नसेल. एखाद्या कलाकृतीचा दर्जा कायम राखणे, हे सोपे काम नाही. ते हिंदीमध्ये होऊ शकेल, असे वाटत नाही. मराठी चित्रपट नव्या रूपात दिसतो आहे. मराठीवाल्यांनी मराठीचे, हिंदीवाल्यांनी हिंदीचे काम करावे. मराठी चित्रपट आता चांगली कमाई करू लागले आहेत. सैराट याचे उदाहरण आहे? ‘सैराट’पेक्षा नागराजचा ‘फँड्री’ मला आवडला. सैराट हे फँड्रीचे पुढील व्हर्जन होते, असे म्हणता येईल. मात्र, सैराटला मांडण्याची पद्धत मात्र नवी होती. तो अगदी नॅचरल पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आला. सैराटच्या यशात अनेक गोष्टी असल्या, तरी त्याचे संगीत हेच खरे सैराटच्या यशाचे कारण असावे, असे मला तरी वाटते. मुळात मराठी सिनेमा फार पुढे गेलेला आहे. वेगवेगळे विषय मराठीतून चांगल्याप्रकारे हाताळले गेले आहेत. यामुळे मराठी चित्रपट आणखी पुढे जाईल ऐवढे नक्की.
- Virendrakumar.Jogi@lokmat.com