गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या अनुराग कश्यपच्या ‘अगली’ चित्रपटाला पुरते अपयश मिळाले आहे. पहिल्या तीन दिवसांतली त्याची कमाई उल्लेखनीय नाही. त्यामुळे त्याचा फायदा ‘पीके’ चित्रपटाला झाला. सध्या ‘पीके’ चित्रपटाला धार्मिक संघटनांचा विरोध सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवरही चित्रपटाला यश मिळते आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणाऱ्या या चित्रपटाने पुढच्या आठ दिवसांत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दहा दिवसांच्या आत त्याची कमाई २३६ कोटी असून पुढच्या आठवड्यात तो २५० कोटींपेक्षाही जास्त कमाई करेल, असे सांगितले जात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पहिल्या आठवड्यानंतरही या चित्रपटाने प्रत्येक दिवशी २० कोटींची कमाई केली. त्याचा संपूर्ण फायदा चित्रपटाला झाला. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्सही मोडले आहेत. आमीरच्याच ‘धूम ३’ चित्रपटाने एकूण १७९ कोटींची कमाई केली होती. मात्र केवळ ७ दिवसांत ‘पीके’ने हा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या दहा दिवसांत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पीके’ चित्रपटाने बाजी मारली आहे. असे चालू असताना चित्रपटाला धार्मिक संस्थांकडून विरोध वाढत आहे. सोमवारी भोपाळपासून अहमदाबाद, जम्मू अशा अनेक शहरांमध्ये विरोध चालू असताना हिंसात्मक वातावरण होते. अनेक चित्रपटगृहांची तोडफोड झाली. तसेच मुंबई आणि राज्यातल्या इतर शहरांमध्ये शो रद्द झाल्याच्याही बातम्या आहेत. संघटनांच्या वाढत्या विरोधामुळे चित्रपट व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे चित्रपट व्यवसायाच्या जाणकारांनी सांगितले. असे नसते तर चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असती. त्याचबरोबर मध्य आणि उत्तर भारतातल्या मजबूत थंडीचाही परिणाम चित्रपटावर झाला. तसेच दक्षिणेत याच दरम्यान रजनीकांतचा ‘लिंगा’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे तेथेही व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.नव्या वर्षातल्या पहिल्या शुक्रवारी परंपरेप्रमाणे एकही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हे वर्षही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ‘पीके’ चित्रपटाला सहजच त्याचा फायदा होणार आहे.