Join us

मराठी तारकांना टॅटूची भुरळ

By admin | Updated: March 9, 2016 01:31 IST

वेगवेगळ्या स्टाईलचे टॅटू अंगावर काढून घ्यायची फॅशन कॉलेज गोइंग तरुणांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सध्या पाहायला मिळत आहे. टॅटूची झिंग आपल्या मराठी तारकांवरदेखील चढलेली आहे.

वेगवेगळ्या स्टाईलचे टॅटू अंगावर काढून घ्यायची फॅशन कॉलेज गोइंग तरुणांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सध्या पाहायला मिळत आहे. दीपिका पादुकोनने तिच्या मानेवर काढलेला ‘आर. के.’ नावाचा टॅटू जोरदार चर्चेत होता. रणबीर कपूरसोबतच्या तिच्या ब्रेकअपनंतर तिच्या टॅटूचे बॉलीवूडमध्ये चांगलेच गॉसिपिंग झाले होते. त्यानंतर प्रियांका चोप्राने तिच्या हातावर ‘डॅडीज लिटील गर्ल’ असा टॅटू काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशाच टॅटूची झिंग आपल्या मराठी तारकांवरदेखील चढलेली आहे. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, मनवा नाईक, मानसी नाईक, प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचे टॅटूप्रेम, त्यांनी ‘सीएनएक्स’सोबत केलेल्या खास बातचीतमधून शेअर केले आहे.गुलाबाची कळी बनून तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या तेजस्विनी पंडितने तिच्या अंगावर तीन टॅटू गोंदविले आहेत. तेजस्विनी म्हणते, ‘टॅटूची क्रेझ ही आत्ता आली आहे, परंतु मी फार पूर्वीच माझ्या पायावर छोट्या डेविलचा टॅटू गोंदवून घेतला होता. आता डेविल म्हटल्यावर, भुवया उंचवायला नको. प्रत्येक डेविल हा वाईट नसतो. माझ्यातदेखील एक छोटासा स्वीट डेविल लपलेला आहे आणि म्हणूनच मी पायावर डेविल काढला. माझ्या हातावर मी माझ्या नवऱ्याचे नाव काढले आहे. त्याच्यासाठी हे बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे असेच मी म्हणेन. माझे बाबा गेल्यानंतर त्यांच्या आठवणीत मी माझ्या बोटावर ‘बाबा’ या अक्षराचा टॅटू काढला आहे.बोल्ड अन् बिनधास्त अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणारी सई ताम्हणकर हिने तर अंगावर चक्क चार टॅटू गोंदविले आहेत. तिने मानेवर रोमन अक्षरात ‘२७ एप्रिल’ अन् ‘७ एप्रिल’ या दोन तारखा गोंदविल्या आहेत. आता असे काय आहे या तारखांमध्ये, तर सईच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे हे दोन दिवस आहेत. यातील एका दिवशी तिला तिच्या नवऱ्याने प्रपोझ केले होते, तर दुसऱ्या तारखेला त्यांचा साखरपुडा झाला होता. दुसऱ्या टॅटूमध्ये तिने स्टार काढला आहे, तर तिचा नवरा अमेय याचे नाव हिब्रुमधून तिने आणखी एका टॅटूमध्ये कोरले आहे. दिलखेच नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी मानसी नाईक आता तिच्या टॅटूने चाहत्यांना क्लीन बोल्ड करीत आहे. मानसीने तिच्या उजव्या कमरेवर ब्लॅक कॅटचा टॅटू काढलाय. मानसी म्हणते, ‘मी हा टॅटू फक्त आणि फक्त माझ्यासाठीच काढलाय. एक काळी मांजर चंद्राच्या चकोरावर जाऊन बसली आहे. मांजरीच्या गळ्यात डायमंड आहे आणि चंद्राच्या चकोरात हार्ट आहेत. ब्लॅक मांजर ही नेहमी वाईटच नसते. चकोर हे खुबसूरतीचे प्रतीक आहे. हार्ट म्हणजे प्रेम आणि प्रेमावर माझा खूप विश्वास आहे. माझं स्वत:चं वेगळं अस्तित्व आहे. माझा हा टॅटू मला डिफाइन करतो.’मालिका व चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील तिच्या उजव्या हातावर ‘ओशो’ नावाचा टॅटू काढला आहे. या टॅटूबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणते, ‘मला फुलपाखरे, चांदण्या, झाडे, पिसे असे टुकारगिरी वाटणारे टॅटू काढायचे नव्हते. काहीतरी इन्स्पायरिंग अशी गोष्ट मला हवी होती. कोणत्याही जाती धर्माशी निगडित काहीच मला काढायचे नव्हते. मी स्वत: जात धर्म मानत नाही आणि म्हणूनच एका अशा व्यक्तीचे नाव मी गोंदविले, जे जात-धर्मापासून वेगळे आहेत, ते म्हणजे ओशो. शूटिंगच्या वेळी टॅटूचा त्रास नक्कीच होतो. मी जेव्हा मेघना म्हणून भूमिका करायचे, त्या वेळी अनेकदा आमचे हातात हात घेतलेले रोमँटिक सीन्स असायचे, मग अशा वेळी तो टॅटू हाइड करायला लागायचा. चेहऱ्यावर मेक अप केला नाही तरी चालायचा, पण हाताला टचअप करायलाच लागायचे.’> मी माझ्यासोबत काय घेऊन जाणार आहे, तर काहीच नाही. म्हणून मला काहीतरी अशी गोष्ट करायची होती, जी कायम माझ्यासोबत राहील. मी तीन टॅटू काढले आहेत आणि ते तिन्ही माझ्या खूप जवळचे आहेत. माझे हे टॅटू माझ्यासोबत असतील आणि माझ्यासोबतच जातील, म्हणून ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत.- तेजस्विनी पंडित> टॅटू काढायचा हे तर मी ठरविले होते, पण मला धर्मनिरपेक्ष टॅटू काढायचा होता. मला तशी इंजेक्शनची फार भीती वाटते. मी कधी इंजेक्शन घेतले नाही. त्यातच काय काढावे सुचत नव्हते, मग फायनली ‘ओशो’ हे नाव कोरायचे जेव्हा निश्चित झाले, तेव्हा मी इंजेक्शनची फिकीर न करता, तो टॅटू गोंदविला.- प्राजक्ता माळी