Join us

​साऊथचा ‘गॉड’ मुंबईत; चाहत्यांची एकच गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 15:37 IST

सुपरस्टार रजनीकांत यांच्या  ‘काला करिकालन’ या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. मुंबईत ‘काला करिकालन’च्या शूटींगचे पहिले शेड्यूल पार ...

सुपरस्टार रजनीकांत यांच्या  ‘काला करिकालन’ या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. मुंबईत ‘काला करिकालन’च्या शूटींगचे पहिले शेड्यूल पार पडणार आहे आणि याच शूटींगसाठी रजनीकांत मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत रजनीकांत आल्याची बातमी फुटण्याची देर की, चाहत्यांची गर्दी जमलीच समजा. झालेही तसेच. वडाला येथे रजनीकांत शूटींगसाठी पोहोचला आणि चाहत्यांची एकच गर्दी जमली. शेकडो चाहत्यांनी रजनीकांला गराडा घातला. रजनीकांतनेही चाहत्यांचे स्वागत मनापासून स्वीकारत त्यांना हात दाखवून अभिवादन केले. तूर्तास रजनीकांत या चित्रपटासह ‘2.0’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे. पा रंजीत दिग्दर्शित  ‘काला करिकालन’ या चित्रपटात  हुमा कुरेशी, नाना पाटेकर यांच्याशिवाय ईश्वरी राव, अंजली पाटील, संपथ, रवि काळे, सयाजी शिंदे, पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पा रंजीत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटातही रजनीकांत दिसला होता. या अ‍ॅक्शनपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक तामिळ मुलगा लहानपणी घरातून पळून मुंबईत येतो आणि मुंबईचा डॉन बनतो, असे याचे कथानक आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे आधी बोलले गेले होते. मात्र धनुषने याचे खंडन केले आहे. हा चित्रपट कुठल्याही अर्थाने हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित नाही. चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, असे धनुष म्हणाला होता.मुंबईत काही सीन्स शूट केल्यानंतर या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण चेन्नईत होणार आहे. चेन्नईत यासाठी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीचा सेट तयार करण्यात आला आहे.