Join us  

कादर खान यांनी निधनाच्या काही वर्षं आधी बॉलिवूडबाबत व्यक्त केली होती ही खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 6:24 PM

कादर खान यांना काम मिळत नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले होते. वाचा काय म्हटले होते ते...

ठळक मुद्देकादर खान यांनी सांगितले होते की, ते आजारी असल्याने अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्यासोबत काम करायचे नाहीये. आजारपणामुळे खूपच कमी लोक त्यांना काम करण्याविषयी विचारत आहेत.

अभिनेता, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि संवाद लेखक कादर खान यांना अखेरीस ‘हो गया दिमाग का दही’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. अनेक हिट चित्रपटात काम करणाऱ्या कादर खान यांनी अभिनयासोबतच कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अ‍ँथनी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे संवाद लिहिले होते. कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 ला निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

कादर खान यांनी २०१५ मध्ये हो गया दिमाग का दही या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ते आजारी असल्याने अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्यासोबत काम करायचे नाहीये. आजारपणामुळे खूपच कमी लोक त्यांना काम करण्याविषयी विचारत आहेत. ते एक चांगले अभिनेते असूनही केवळ आजारपणामुळे लोक त्यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत या गोष्टीचे त्यांना प्रचंड दुःख वाटते. 

त्यांनी मुलाखतीत पुढे हे देखील सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात तर माझी तब्येत इतकी बिघडलेली नव्हती. केवळ वयानुरूप मला थोडासा त्रास होत होता. पण तेव्हापासूनच लोक माझ्यापासून दूर पळायला लागले होते. त्यांना माझ्यासोबत काम करण्यात रस नव्हता. एक कलाकार म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता. 

हो गया दिमाग का दही या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील त्यांना चालायला, बोलायला खूपच त्रास होत होता. पण तरीही अभिनयाविषयी असलेल्या त्यांच्या प्रेमापायी त्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील ते सगळीकडे आवर्जून उपस्थिती लावत होते.

कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कुली, होशियार, हत्या यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच हाय पडोसी कौन है दोशी, हसना मत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते. 

टॅग्स :कादर खान