Join us

अरेरे....कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनुष्काची घोडचूक

By admin | Updated: July 28, 2015 21:22 IST

अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्विटरव्दारे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली खरी मात्र तिने कलाम यांचे नाव चुकवल्याने तिच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली असून सोशल मिडीयावरही कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्विटरव्दारे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली खरी मात्र तिने कलाम यांचे नाव चुकवल्याने तिच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. 
 
मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी शिलाँगमध्ये निधन झाले. कलाम यांच्या निधनाचे वृत्त येताच देशभरातून कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. ट्विटर, फेसबुक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवरही कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून अभिनेत्री अनुष्का शर्मानेही कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. पण यात अनुष्काने कलाम यांचे नाव चुकवले. 'एबीजे अब्दुल कलाम आझाद हे प्रेरणादायी व्यक्तीमत्व असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो' असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. अनुष्काच्या या ट्विटवर जोरदार टीका सुरु झाली. सोशल मिडीयावर वादग्रस्त टिवटिव करणारा अभिनेता कमाल खानने अनुष्का शर्माची तुलना थेट आलिया भटशी केली. अनुष्काने ही चुक सुधारत नवीन ट्विट केले असले तरी तोपर्यंत तिच्या या चुकीवर सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
एकीकडे अनुष्का शर्माने कलाम यांच्या नावावरुन गोंधळ घातला असतानाच विधीमंडळात कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनीदेखील कलाम यांच्या नावाचा उल्लेख करताना गोंधळ घातला. माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात दोन वेळा कलाम यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला.