ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुख्य प्रवाहातील चित्रपटांसोबतच समांतर चित्रपट गाजवणारा हरहुन्नरी कलाकार आपल्यातून गेला. १९७२ साली अभिनयक्षेत्रात आलेल्या ओम पुरी यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्यात. यातील काही भूमिका कायमच स्मरणात राहतील. त्याचाच हा आढावा...>अर्धसत्य:१९८३ मध्ये आलेल्या ‘अर्धसत्य ’ या चित्रपटातील ओम पुरी यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैैकी एक ठरली. यात त्यांनी प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यासाठी ओम पुरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.>आक्रोश : स्मिता पाटील, नसिरूद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या १९८०मध्ये आलेल्या ‘आक्रोश’ या चित्रटात ओम पुरींची भूमिका यादगार ठरली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी ओम पुरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.>आरोहण :सावकाराच्या जाचात अडकलेल्या हरी या गरीब शेतकऱ्याची भूमिका ओम पुरी यांनी ‘आरोहण’मध्ये साकारली होती. याच भूमिकेने ओम पुरी यांना त्यांच्या आयुष्यातील पहिलावहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता.>जाने भी दो यारों:‘जाने भी दो यारों’या ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटातील ओम पुरींची भूमिका प्रचंड गाजली होती. यात त्यांनी अहुजा नावाच्या भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारली होती.>तमस : भीष्म साहनी यांच्या कादंबरीवर आधारित ‘तमस’ या चित्रपटात ओम पुरी यांनी नाथूची भूमिका साकारली होती. आपली गर्भवती पत्नी आणि वृद्ध आईला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा नाथू आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे.>आस्था :१९९७ मध्ये ओम पुरी यांनी अभिनेत्री रेखासोबत एक बोल्ड सिनेमा केला होता. त्याचे नाव होते, ‘आस्था’. यात ओम पुरी यांनी रेखाचा पती अमर याची भूमिका साकारली होती. यात दोघांमध्ये अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले होते.
ओम पुरी यांच्या काही अजरामर भूमिका
By admin | Updated: January 7, 2017 03:25 IST