Join us  

Nusrat Jahan: नुसरत जहाँच्या दाव्यावर कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; निखील जैनसोबतचं लग्न ठरवलं अवैध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 9:00 PM

नुसरत जहाँसोबत घटस्फोटासाठी निखील जैननं कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. यात नुसरत जहाँने कोर्टासमोर तिचं म्हणणं मांडलं ते कोर्टानेही मान्य केले

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ(Nusrat Jahan) ही निखील जैनसोबत लग्न करुन वादात अडकली होती. १९ जून २०१९ रोजी नुसरत आणि निखील दोघंही विवाहाच्या बंधनात अडकले. मोठ्या धुमधडाक्यात हे लग्न झालं. तुर्कीत हे लग्न झाल्यानं टर्किश मॅरिज रेग्युलेशनमध्ये त्याची नोंद झाली. परंतु तुर्कीचा कायदा भारतात मान्य नाही त्यामुळे नुसरत आणि निखीलच्या लग्नाला कुठलीही मान्यता नसल्याचा दावा नुसरतनं कोर्टात केला.

नुसरत जहाँसोबत घटस्फोटासाठी निखील जैननं कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. यात नुसरत जहाँने कोर्टासमोर तिचं म्हणणं मांडलं ते कोर्टानेही मान्य केले. कोर्टाने निखील जैनला सांगितले की, तुमच्या लग्नाला कुठलेही कायदेशीर मान्यता नाही त्यामुळे यावर दुसरा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही. त्यामुळे आता निखील जैन आणि नुसरत जहाँ यांच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. निखील जैनसोबत वाद झाल्यानंतर नुसरतनं दुसरं लग्न केले. परंतु निखीलनं तिच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. निखीलचा आरोप होता की, नुसरतचा माझ्या संपत्तीवर डोळा आहे असं म्हटलं होतं तर नुसरतनं निखीलवर तिच्या कुटुंबाच्या बँक खात्याचा वापर केल्याचा आरोप लावला होता.

 

काय म्हणाली होती नुसरत जहाँ?

निखिलने नुसरतसोबत लग्न करताना एकही रुपया खर्च केला नव्हता. उलटपक्षी लाजेखातर नुसरतलाच हॉटेलचं बील भरावं लागलं होतं. "त्याने माझ्यासोबत लग्न करताना एक रुपयाही खर्च केला नव्हता. इतकंच काय तर साधं हॉटेलचं बील सुद्धा भरलं नव्हतं. मला त्याला काहीच सांगायची गरजच नाही. मी प्रामाणिक आहे. पण, माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळेच आता मी हे स्पष्टीकरण देत आहे", असं नुसरत म्हणाली होती. पुढे तीने सांगितले की, " दुसऱ्यांना बदनाम करणं सोपं असतं. दुसऱ्यांविषयी चुकीच्या अफवा पसरवणंही सोपं असतं. पण या सगळ्या वादात मी कधीच कोणावर आरोप केले नाहीत असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं.

काय होता वाद?

नुसरत यांनी २०१९ मध्ये निखील जैनसोबत लग्न केलं होतं. तुर्कीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी नुसरत व निखील यांच्या नात्यात मतभेद निर्माण झालेत आणि कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. इतकंच नाही तर निखीलसोबतचं आपलें लग्न अवैध असल्याचा दावा करून नुसरत यांनी खळबळ निर्माण केली होती.

टॅग्स :नुसरत जहाँन्यायालय