Join us

आता 'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना अलविदा

By admin | Updated: March 8, 2016 08:31 IST

'का रे दुरावा' ही लोकप्रिय मालविका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - एक सून व सहा सासवांची अनोखी कहाणी सांगणारी ' होणार सून मी या घरची ' आणि दोस्तांच्या दुनियेचं दर्शन घडवणारी ' दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकांनंतर झी मराठी वाहिनीची आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांना अलविदा करणार आहे... ती मालिका आहे 'का रे दुरावा'... मालिका संपतानाच जय व अदिती यांच्यातील दुरावा संपून कहाणी सुफळ संपूर्ण होणार का याकडेचे रसिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या सव्वा ते दीड वर्षांपासून झी मराठीवर प्रदर्शित होणा-या या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवले. समजूतदार, शांत, गुणी आणि एकमेकांवर भरभरून प्रेम करणारे जय -अदिती या विविहीत जोडप्याला ऑफीसच्या विचित्र नियमामुळे एकत्र काम करतानाही अनोळखी बनून रहावे लागते. हा लपवाछपवीचा खेळ खेळता खेळता येणारे कडू-गोड प्रसंग, ऑफीसमधील काही सहका-यांची मिळालेली साथ आणि अशा अनेक किश्शांमुळे हे सर्वजण प्रेक्षकांना आपल्याच घरातील एक असे वाटू लागले. मात्र येत्या २६ मार्च रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी २८ मार्चपासून एक नवी मालिका सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. 
दरम्यान 'का रे दुरावा' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे सुयश टिळक, सुरूची अडारकर यांना तर प्रेक्षकांचे भरूभरून प्रेम मिळालेच, पण अनेक पुरस्कारही त्यांनी पटाकवले. या शिवाय सुबोध भावे, इला भाटे, नेहा जोशी यांच्यासह अनेकांचा व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना खूप भावल्या. विशेष म्हणजे अरूण नलावडे यांनी साकारलेली केतकर काकांची व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातीलच एक व्यक्ती वाटली. 
दरम्यान, आता या मालिकेचा शेवट नक्की कसा होणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जय आणि आदितीच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कळल्यानंतर नक्की काय होणार, देव सर आणि ऑफिसमधील इतर मंडळी कशी रिअॅक्ट होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.