Join us

भन्नाट मांडणीचा लक्षवेधी आविष्कार

By admin | Updated: June 16, 2014 11:42 IST

तृतीयपंथीय व्यक्तीतला माणूस शोधण्याचा प्रयत्न झाल्याचे सहज आढळून येत नाही. नेमके हेच वैशिष्ट्य अधोरेखित करत या व्यक्तींमधल्या माणसाला साद घालण्याचे काम ‘जयजयकार’ हा चित्रपट करतो.

राज चिंचणकर

मराठी चित्रपट-   जयजयकार

दर्जा - चांगलाएखाद्या तृतीयपंथीय पात्राचा समावेश चित्रपटात करायचा आणि त्याला केवळ करमणुकीपुरते चित्रपटात स्थान द्यायचे, असा प्रकार अनेकदा दिसतो. परंतु समाजातील या उपेक्षित वर्गाचे अंतरंग जाणून घेत, तृतीयपंथीय व्यक्तीतला माणूस शोधण्याचा प्रयत्न झाल्याचे सहज आढळून येत नाही. नेमके हेच वैशिष्ट्य अधोरेखित करत या व्यक्तींमधल्या माणसाला साद घालण्याचे काम ‘जयजयकार’ हा चित्रपट करतो.तृतीयपंथीयांशी संबंधित असा हटके विषय चित्रपटात घेतल्यावर तो क्लिष्ट किंवा प्रचारकी बाजाकडे झुकू शकतो; परंतु विषयाला हलकीफुलकी ट्रिटमेंट देत समाजापर्यंत जो संदेश जायला हवा, त्याकडे सर्वार्थाने लक्ष पुरवत ‘जयजयकार’ साकार होत जातो. चित्रपटाच्या या मांडणीमुळेच तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याचे सामर्थ्य या चित्रपटाने उत्तम प्रकारे पेलले आहे. चित्रपटाची कथा तशी छोटीशी असली तरी, त्यात कलाटणी देत आमूलाग्र स्वरूप बदललेल्या साच्यात हा वर्ग या चित्रपटात समोर येतो.विक्षिप्त, अवखळ, जिद्दी, हट्टी अशी विशेषणे ज्याला शोभून दिसतील असा निवृत्त मेजर अखंड यांची एका अपघाताने चार तृतीयपंथीयांशी गाठ पडते आणि स्वत:च्या जिद्दी स्वभावानुसार मेजर त्या चौघांचे आयुष्य पार बदलून टाकतो. उपेक्षित वर्गालाही समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सूतोवाच करत त्यांच्यातला माणुसकीचा गौरव करत रंजकतेने ही कथा मनावी पकड घेत जाते. असा चाकोरीबाहेरचा विषय सुचणे, तो लेखणीतून उतरवणे आणि पडद्यावर त्याची मांडणी करणे, या अवस्था शंतनू रोडे यांनी ‘जयजयकार’मध्ये पेलल्या आहेत. दिग्दर्शनाचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आणि त्यात त्यांनी बाजी मारली आहे. चित्रपटात अभिनयाची खणखणीत नाणी आहेत आणि ती जोरकसपणे वाजली आहेत. विविध भूमिका केवळ आपल्या अस्तित्वाने जिवंत करणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी यात रंगवलेला मेजर त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवणारा ठरला आहे. तृतीयपंथीयांचे जीवन अक्षरश: जगल्यासारखे वाटायला लावणारी यातली चौकडी अफलातून आहे. यात संजय कुलकर्णी (मौसी) यांनी दृष्ट लावण्याजोगे काम केले आहेत. त्यांच्यासोबत भूषण बोरगावकर यांनी रंगवलेली चंपा अप्रतिम वठली आहे. धवल पोकळे (राणी) आणि आकाश शिंदे (लाजो) या दोघांची कामगिरी सरस आहे. सुहिता थत्ते यांनी रंगवलेली मैत्रीणही लक्षात राहते. उपेक्षित वर्गातल्या माणुसकीच्या जयजयकार करणारा हा चित्रपट त्यांच्या भन्नाट मांडणीमुळे लक्षवेधी ठरला आहे.