पाकिस्तान आणि दहशतवाद याबाबत गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट आले. या सर्व चित्रपटांच्या यादीत आता वाशू भगनानी निर्मित ‘वेलकम टू कराची’चीही भर पडली आहे. चित्रपटाच्या कथेत दोन पात्रे शम्मी ठाकूर (अर्शद वारसी) आणि केदार पटेल (जॅकी भगनानी) आहेत. यापैकी एक जण चुकून पाकिस्तानच्या कराची शहरात पोहोचतो आणि तेथे त्याला तालिबानी दहशतवादी ताब्यात घेतात. दोघेही तालिबानचा एक मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात यशस्वी होतात, याचा अमेरिकेपर्यंत गवगवा होतो. पाकिस्तान या दोघांनाही आपल्या देशाचे हीरो म्हणून सादर करतो. संपूर्ण चित्रपटात दोघेही मायदेशी परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. मात्र ते पाकिस्तानातच अडकून पडतात. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्येही अशाच प्रकारचे नाट्य घडते.उणिवा - खराब दर्जाची सर्व लक्षणे या चित्रपटात आहेत. दिग्दर्शक आशिष मोहन यांच्याकडे कथाही नाही आणि दमदार पटकथाही त्यांना देता आली नाही. याचमुळे सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या हाती निराशा लागते. संपूर्ण काळात चित्रपट कधी संपतो याचीच प्रतीक्षा करावी लागते आणि प्रेक्षक याच चिंतेत असताना पडदा पडतो. खराब कथा आणि कमजोर पटकथेमुळे चांगले सांगावे, असे काहीच सापडत नाही. वाशू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी याच्याकडून तर कोणत्याही चांगल्या अभिनयाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मात्र, अर्शद वारसीसारख्या कलाकारानेही या चित्रपटात प्रेक्षकांची पूर्ण निराशा केली आहे. अर्शदच्या हावभावावरून त्याने या चित्रपटात कसे काम केले असेल ते जाणवते. अभिनेत्रीच्या नावावर लॉरेन गाटिबोभोवतीच्या ग्लॅमरचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. दलीप ताहिल आणि अन्य साहाय्यक कलाकारांनाही चित्रपटाला दमदार बनवण्यात यश आले नाही. संपादन निकृष्ट दर्जाचे असून कॅमेरावर्कही कमजोर आहे. दिग्दर्शनाच्या नावावर आशिष मोहन यांनी आपल्याला चित्रपट बनवता येत नाही, हे दाखवून दिले आहे.