Join us  

नाट्यसंगीत हा माझा ‘वीक पॉइंट’ - प्रशांत दामले

By admin | Published: September 30, 2015 1:46 AM

नाट्यसंगीत गाणे ही गमतीची गोष्ट नाही. नाट्यसंगीत तर माझ्या घरातच होते. पण ज्या सहजतेने नाटकातील माझे गद्य संवाद तोंडपाठ होतात

मुंबई : नाट्यसंगीत गाणे ही गमतीची गोष्ट नाही. नाट्यसंगीत तर माझ्या घरातच होते. पण ज्या सहजतेने नाटकातील माझे गद्य संवाद तोंडपाठ होतात; तसे गाण्यांचे शब्द पाठ करणे मात्र मला कठीण जाते. पण तरीही नाट्यसंगीत हा माझा ‘वीक पॉइंट’ आहे आणि चांगले संगीत नाटक हाती आले तर मी ते नक्की करीन, असे मत नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ रंगकर्मी फैयाज यांना त्यांच्या हस्ते विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.रंगशारदा प्रतिष्ठान व विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्याधर गोखले यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात रंगभूमीवरील अमूल्य योगदानाबद्दल फैयाज यांना गौरविण्यात आले. फैयाज यांच्या पिढीने कष्ट कसे करावेत, हे आमच्या पिढीला शिकविले. प्रतिकूल स्थितीतही त्यांनी संगीत रंगभूमी टिकवून ठेवली, अशा मेहनती कलावंताला माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, हे माझेच भाग्य आहे, असेही प्रशांत दामले पुढे म्हणाले.या सोहळ्यात नाट्यसंगीत पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नटवर्य भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले या संगीत रंगभूमीवरील दोन अण्णांच्या नाट्यकर्तृत्वाची महती विशद करणारा ‘रमारमण श्रीरंग जय जय’ हा कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आला. रंगकर्मी विजय गोखले, विघ्नेश जोशी, श्रीकांत व शुभदा दादरकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)