Join us

‘नेपोटिझम’ बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग

By admin | Updated: April 22, 2017 03:12 IST

‘बस यूंही’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारा अभिनेता पूरब कोहली याने आज इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजन, व्हीजे असा सगळा प्रवास

- Rupali Mudholkar‘बस यूंही’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारा अभिनेता पूरब कोहली याने आज इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजन, व्हीजे असा सगळा प्रवास करून पूरब बॉलिवूडमध्ये आला आणि स्थिरावला. लवकरच पूरब त्याच्या एका नव्या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात काम करण्याचा पूरबचा अनुभव कसा राहिला? जाणून घेऊ या, त्याच्याच शब्दांत....इंड्रस्टीत सध्या ‘नेपोटिझम’ (नातेवाईकांसाठी, सगेसोयऱ्यांसाठी केलेली वशिलेबाजी) वर जोरदार चर्चा सुरू आहे. तू काय सांगशील? - माझ्या मते, नेपोटिझमच्या आधी कमर्शिअलिझम येते. आपली मुलं स्टार व्हावीत, असे इंडस्ट्रीतील लोकांना वाटत असेल तर ते स्वाभाविकही आहे. पण एक मात्र तितकेच खरे, तुम्ही स्टारकिड्स आहात किंवा एखाद्याचे आवडते आहात, म्हणून संघर्ष नाही, असे नाहीच. या इंडस्ट्रीत संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. स्टार किड्सला कदाचित संधी सहज मिळत असतीलही पण इथे टिकायचे तर स्ट्रगल आणि टॅलेंट लागतेच लागते. नेपोटिझम आज कुठे नाही. सगळीकडेच आहे. माझ्या मते, या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीचा भाग आहेत.तुझ्या आगामी चित्रपटात तू एका वॉर जर्नलिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल काय सांगशील.- वॉर जर्नलिस्ट या शब्दावरून तुम्ही या भूमिकेचा अंदाज घेऊ शकता. अतिशय आव्हानात्मक भूमिका असेच मी भूमिकेबद्दल सांगेल. या चित्रपटात आयन बॅनर्जी नामक एका वॉर जर्नलिस्टची व्यक्तिरेखा मी साकारलेली आहे. इराकच्या युद्धात आयनने एक आयकॉलिन फोटो घेतलेला असतो. तो फोटो जगभर व्हायरल होतो, गाजतो, अशी त्याची बॅकस्टोरी आहे. आयन मुंबईमध्ये एका एक्झिबिशनसाठी येतो आणि यानंतर अनेक वळणाने या चित्रपटाची कथा पुढे सरकते.सोनाक्षी सिन्हासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा राहिला?- सोनाक्षीसोबत काम करताना जाम मज्जा आली. आम्ही दोघे सेटवर नुसती धम्माल करायचो. सोनाक्षी अतिशय निष्ठेने काम करते. कामाप्रतिची तिची निष्ठा, तिची कष्ट घेण्याची तयारी, असे सगळे तिच्यातील गुण मला यादरम्यान हेरता आले.तुझा हा आगामी चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट आहे. अशा चित्रपटात काम करण्यात अभिनेत्यांना फारसा रस नसतो. तुझे याबद्दल काय मत आहे.- मीच माझ्या सिनेमाचा हिरो असायला हवे, असे सगळ्यांनाच वाटते. मलाही असेच वाटते. पण बरेचदा एक चांगला प्रोजेक्ट हाही भाग महत्त्वाचा ठरतो. चित्रपटाची कथा, त्यातील स्वत:चे पात्र हेही चित्रपट निवडताना महत्त्वाचे ठरते. या कसोट्यांवर माझा हा चित्रपट एक चांगला प्रोजेक्ट होता. त्याला नाकारण्याचे काहीच कारण माझ्याकडे नव्हते. माझ्या एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना मला या चित्रपटासाठी विचारणा झाली. या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत याआधीही मी काम केलेले होते. त्यामुळे मी स्क्रिप्ट वाचायला मागितली. ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी या कथेच्या जणू प्रेमातच पडलो. अशा चित्रपटाला नकार देणे, माझी मोठी चूक ठरली असती.तुझा आगामी चित्रपट आणि रवीना टंडनचा चित्रपट या दोन्ही चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचा किती ताण वा दबाव जाणवतो?- खरे सांगायचे तर माझ्यावर फारसे प्रेशर नाही. (हसत हसत) माझ्या मते, सोनाक्षीवर प्रचंड प्रेशर असणार. पण दोन फिमेल ओरिएन्टेड चित्रपट एकाच आठवड्यात रिलीज होत आहेत. सोनाक्षी व रवीना दोघींचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. म्हणजे देशातील सगळ्या महिला या आठवड्यात बिझी असणार आहेत. (हसत हसत) पूरब, येणाऱ्या वर्षांत बॉलिवूडमध्ये तू स्वत:ला कुठे पाहतोस?- मी आधीच बोलल्याप्रमाणे, माझ्या चित्रपटाचा मीच हिरो असावे, असे सगळ्यांनाच वाटते. मलाही हेच वाटते. चांगले चांगले दिग्दर्शक, उत्तम कथा माझ्या वाट्याला याव्यात. माझे चित्रपट सुपरहिट व्हावेत. एक मोठा स्टार म्हणून माझे नाव व्हावे, असे सगळ्यांनाच वाटत असते. मीही याला अपवाद नाही. प्रयत्न हेच आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर दोन-चार सुपरहिट चित्रपटांची गरज आहे. असे झाले तर मलाही ते हवे आहे.तुझे भविष्यातील प्रोजेक्ट कुठले.- सेन्स 8 या माझ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टचे दुसरे सीझन येत्या मे मध्ये येत आहे. यानंतरच्या प्रोजेक्टबद्दल मी वेळोवेळी माहिती देत राहिलच.