Join us  

रहस्य, रोमांच व संवेदनांचा वेधक प्रवास

By admin | Published: August 01, 2015 4:05 AM

‘दृश्यम’ हा हिंदी भाषेतील चित्रपट खुनाचा तपास करताना रहस्यमयता आणि थरार निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक निशिकांत कामत आहेत. हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेतला

- अनुज अलंकार

‘दृश्यम’ हा हिंदी भाषेतील चित्रपट खुनाचा तपास करताना रहस्यमयता आणि थरार निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक निशिकांत कामत आहेत. हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेतला असून तो तेलगू आणि तमिळ भाषेनंतर आता हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. गोव्यातील गाव हे दृश्यमच्या घडामोडींचे केंद्र. विजय साळगावकर (अजय देवगण) पत्नी (श्रेया शरण) आणि दोन मुलींसोबत सर्वसामान्य जीवन जगत असतो. त्याची मोठी मुलगी शाळेच्या सहलीसोबत जाते. सहलीत शाळेतील एक अतिआगाऊ मुलगा विजयच्या मुलीचा आक्षेपार्ह असा व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. विजयच्या पत्नीला हे समजते तेव्हा ती मुलीच्या पाठीशी उभी राहते. ब्लॅकमेल होत असताना अशा काही घटना घडतात की त्यात तो मुलगा मरण पावतो. आई आणि मुलगी घाबरून मुलाला घराच्या अंगणात पुरून टाकतात. विजयला नंतर हा घटनाक्रम समजतो तेव्हा तो आपली पत्नी आणि मुलीच्या सुरक्षिततेकडे लक्ष देतो. विजयची सगळी धडपड मुलगी आणि पत्नीला पोलीस आणि तुरुंगापासून दूर राखण्यासाठी असते. विजय आणि त्याच्या कुटुंबासमोर मृत मुलगा गोव्याच्या पोलीस महासंचालक मीरा देशमुख (तब्बू) यांचा असल्याचे समजल्यावर मोठेच आव्हान उभे राहते. आयजींचाच मुलगा बेपत्ता असल्यामुळे त्याच्या शोधासाठी सगळा पोलीस विभागच कामाला लागतो व शंकेचा बाण विजय आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत येऊन थांबतो. एकीकडे विजय कायद्याचा फास कुटुंबीयांना बसू नये म्हणून धडपडत असतो तर मीरा देशमुख त्याला त्यात आणण्याच्या प्रयत्नात असतात. ‘दृश्यम’चा कळस अशा एका बिंदूवर येऊन थांबतो की प्रेक्षक थक्क होतात.वैशिष्ट्ये : चित्रपटाच्या मूळ कथेत कुठलीही लुडबूड न करून निशिकांत कामत यांनी मोठाच संयम बाळगला आहे. त्यामुळेच चित्रपटाची पकड कायम राहते व तो थरार पुढे पुढे जात राहतो. चित्रपटाला कृत्रिम गती देण्याच्या मोहात भूमिकांनाही कोणतीही घाई करू देण्यात आलेली नाही. उलट त्यांना चांगल्या पद्धतीने सामावून घेण्यात आले आहे. याचा लाभ असा झाला की कथा जशी पुढे सरकते तशी त्याला योग्य गतीही मिळते. कथा ही ‘दृश्यम’चे सगळ्यात मोठे बलस्थान आहे. एका पुरुषाच्या आपल्या कुटुंबीयांबद्दलच्या संवेदनांशी ती थेट भिडते. अभिनयात अजय देवगणने डाव जिंकला आहे. सामान्य माणसाच्या संवेदनांना मांडण्यात अजय देवगणने मोठे यश मिळविले आहे. विजय साळगावकर हा अजय देवगणच्या उत्कृष्ट अभियनांतील एक आहे. श्रेया शरणने त्याच्या पत्नीची भूमिका खूपच छान साकारली आहे. इशिता दत्ताने त्यांच्या मोठ्या मुलीचे आणि मृणाल जाधवने धाकट्या मुलीचे काम प्रभावीपणे केले आहे. दिग्दर्शक या नात्याने निशिकांत कामत यांना एक चांगला थरार चित्रपट बनविण्यात बरेच यश मिळाले आहे.उणिवा : तब्बू बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसली तरी तिचे काम काहीसे निराशाजनक आहे. मीरा देशमुखची भूमिका साकारण्यात तब्बूकडून ज्या अपेक्षा होत्या त्यात ती कमी पडली. तिच्या अभिनयात अपुरेपणा जाणवतो. तिच्या पतीच्या भूमिकेत रजत कपूर यांना फार काही वाव नाही. चित्रपटात अनेक गीते असली तरी एकही आठवत नाही. अशा चित्रपटांत गीत व संगीताला फारसा वाव नसतो म्हणून या बाबी खटकतात. हिंदी भाषिक राज्यांत ‘दृश्यम’ हे चित्रपटाचे नावही अडथळा ठरेल.का पाहावा :चांगला थरारपट.का पाहू नये : विनोदी चित्रपट पाहणाऱ्यांची निराशा होईल