हिंदी-मराठीतील मुलीच्या पाठवणीची अनेक गाणी प्रचंड गाजली. या सर्व गाण्यांमागचे सूत्र पाहिले, तर लक्षात येते, की या गाण्यांमधील सुरांची आर्तता आणि शब्दांची आशयघनता यांनी ती लोकप्रिय ठरविली. याच मालिकेत ‘मुंबई-पुणे- मुंबई २’ मध्ये ‘बॅँडबाजा’ गाणे आले आहे. मात्र, नुसते सुंदर चेहरे आणि सेट यातून गाण्याचा सूरच हरविला आहे.‘हम आपके है कोन’ पासून ते अनेक चित्रपटांतील गाण्याची जणू ‘कॉपी’ केली आहे. गाण्यातून दर्शवायचे काय आहे, समजेना? असे रसिकांना वाटू लागले आहे. याच चित्रपटातील ‘साथ दे तू मला’ या गाण्याला रसिकांची बिलकुल साथ मिळाली नाहीच. पण चित्रपटाचा यूएसपी मानल्या जाणाऱ्या ‘बॅँडबाजा’ची अवस्था तर त्यापेक्षा आणखी वाईट झाली आहे. माहेर सोडून चाललेल्या मुक्ता म्हणजेच गौरीला हसवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न पण तो इतका केवीलवाणा वाटतोय, की त्यापेक्षा गौरीला मनसोक्त रडू दिले असते, तर प्रेक्षकांना अधिक चांगले वाटले असते, अशा प्रतिक्रिया रसिक व्यक्त करीत आहेत. स्वप्नील जोशीला तर या गाण्यामध्ये पूर्ण वाया घालविला आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटातील ‘कधी तू’ हे गाणेही थोडेसे मध्येच घुसवल्याने चालू असलेल्या गाण्यातून बाजूला गेल्याचाही फील येतो. हा चित्रपट लग्नसमारंभावर आधारित आहे, म्हणतात. कोणत्याही लग्नातला सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाठवणीच्या सिनच्या गाण्याची अशी कथा असेल, तर चित्रपटाबाबत जरा विचारच करावा, असे आता रसिक म्हणू लागले आहेत.
एमपीएम २चा ‘बँडबाजा’ रसिकांच्या मनात वाजेनाच
By admin | Updated: October 29, 2015 23:10 IST