ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - कयामत से कयामत तक, इश्क, सरफरोश, लगान, रंग दे बसंती असे एका पेक्षा एक हिट सिनेमा देणा-या आमीर खानच्या आयुष्यातही उतार आला होता. चित्रपट सातत्त्याने फ्लॉप ठरत असल्याने माझे करियर संपुष्टात आले अशी मला वाटत होती असे आमीरने मम्हटले आहे.
आमीर खानच्या कयामत से कयामत तक या सिनेमाला आता २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आमीर खानने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्याने आयुष्यात आलेल्या चढउतारांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. कयामत से कयामत तक हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर मी जेवढे चित्रपट स्वीकारले ते बॉक्स ऑफीसवर सपाटून मार खात होते. प्रसारमाध्यमातून मला एक चित्रपटाचा हिरो असे हिणवले जात होते. काही अंशी त्यांच्या दाव्यांमध्ये तथ्य असल्याचे मला जाणवत होते असे आमीरने नमूद केले.
चित्रपट चालत नसल्याने मी अक्षरशः खचून गेलो, सिनेसृष्टीतील करियर संपले असे मला वाटत होते. त्यानंतर मला महेश भट यांनी एक सिनेमा ऑफर केला पण स्क्रिप्ट न आवडल्याने मी त्याला नकार दिला अशी आठवण त्यांनी सांगितले. स्क्रिप्ट आवडत नाही तोपर्यंत काम करायचे नाही या निर्णयावर मी ठाम होतो व त्यावेळी मी ही कणखर भूमिका घेतली नसती तर माझे करियर इथपर्यंत पोहोचले नसते असेही आमीरने म्हटले आहे.