अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक असे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेले ‘चतुरस्र’ व्यक्तिमत्त्व म्हणजे केदार शिंदे. जत्रा, अगं बाई अरेच्चा.., खो-खो यांसारखे अनेक चित्रपट आणि कित्येक मराठी मालिकांचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले. ‘घडलंय-बिघडलंय’ या कार्यक्रमातून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर व्यंगात्मक टिप्पणी करून, अनेकांच्या टोप्या उडविल्या. आपली मते रोखठोकपणे मांडण्यात ते कधी कचरत नाहीत. कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून नावीन्याचा शोध घेणारे केदार शिंदे मराठी चित्रपटसृष्टीच्या सद्य:स्थितीवर ‘सीएनएक्स’च्या वाचकांशी ‘सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून संवाद साधत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये हाताळण्यात येणारे विषय... कलात्मकतेच्या नजरेतून केली जाणारी मांडणी.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर... या गोष्टींमुळे मराठीचा ‘कॅनव्हास’ निश्चितच मोठा झाला हे पाहून बरे वाटत आहे; मात्र तीन दिवसच मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये तग धरून राहतो, हीदेखील वस्तुस्थिती आहे. शुक्रवार ते रविवारपर्यंत तो चालला तर ठीक असते, नाही तर तो सोमवारी बाहेर पडतो. याला काही प्रमाणात मराठी चित्रपटांची वाढती संख्यादेखील कारणीभूत आहे. एकाच दिवशी तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. म्हणजे ५२ आठवड्यांमध्ये १५० चित्रपटांची निर्मिती होते. त्यामुळे प्रेक्षक विभागला जात आहे, यातच वर्षभरात चित्रपट प्रदर्शित करण्यावरही कमालीच्या मर्यादा आहेत. परीक्षेचा हंगाम किंवा आयपीएलच्या काळात चित्रपट प्रदर्शित करून काही फायदा नसतो. हे पाहता निर्मात्यांना प्रदर्शनासाठी आठच महिन्यांचा कालावधी मिळतो, हीदेखील वस्तुस्थिती आहे, हे सर्व उमजत असूनही ते कुणीच रोखू शकत नाही. मध्यंतरीच्या काळात अशी स्थिती होती, की मराठी चित्रपटसृष्टीत ७ ते ८ निर्मात्यांचेच बऱ्यापैकी बस्तान बसले होते. त्यांचेच चित्रपट व्यवस्थित चालत. आता मात्र रोज नवीन निर्माता चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश करीत आहे. डिजिटलायझेशनच्या युगात प्रदर्शनाच्या रात्रीच पायरेटेड कॉपी हातात पडत आहे. मराठी चित्रपटाने कात टाकल्याचे बोलले जात असले, तरी हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत.
(शब्दांकन : नम्रता फडणीस)