ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा व दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंगळवारी दिल्लीत ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठी भाषा श्रेणीत किल्ला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला. हिंदी चित्रपटांमध्ये 'क्वीन'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून या चित्रपटातील कसदार अभिनयासाठी कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हैदर चित्रपटालाला चार श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. नानू अवनल्ला अवलू या कन्नड चित्रपटातील अभिनयासाठी विजय यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. मेरी कॉमला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.